शहरासह जिल्ह्य़ातील अनेक भागास रविवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने झोडपून काढले. या पावसाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर तपोवनात सुरू असलेल्या कामांवर परिणाम झाला असून घरांसाठी उभारण्यात आलेले बांबू आणि पत्रे कोसळले. यात एक कर्मचारीही जखमी झाला. तर, लासलगाव परिसरात विजेच्या तारेचा धक्का लागल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाला.
शनिवारी नाशिक शहर व परिसरात सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला होता. रविवारी सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवू लागल्याने पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात झाली. सुमारे तासभर कोसळलेल्या पावसाने तपोवन परिसरात सुरू असलेल्या साधुग्राममधील कामांची दैना उडाली. वादळाने घरांसाठी उभारण्यात आलेले बांबू आणि प्लास्टिकचे पत्रे कोसळले. त्याचा फटका एका कर्मचाऱ्यालाही बसला. पावसामुळे चिखल झाल्याने काम त्वरीत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
शहरात ही स्थिती असताना जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात घरांवरील पत्रे उडण्याचे प्रकार घडले. लासलगाव परिसरातील पाचोरे येथील शिवाजीराव जगताप यांच्या मालकीच्या शिवापूर येथील शेतात विजेची तार खाली पडल्याने धक्का लागून म्हैस आणि गाय यांचा मृत्यू झाला. येवला तालुक्यातील पारेगाव येथे बद्रीनाथ वाळके यांच्या घराचे पत्रे उडाले. वादळी वाऱ्यामुळे घराच्या भिंतीचेही नुकसान झाले. कळवण तालुक्यातील ओतूर येथे जिल्हा बँक शाखेच्या कार्यालयावरील पत्रे उडाले. बँकेत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने त्याचा बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याशिवाय मनमाड परिसरात सुमारे दोन तास पाऊस झाला. दिंडोरी, देवळा, मालेगाव, निफाड, पिंपळगाव येथेही कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली.