रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह  पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागांमधील मोहोर गळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर इत्यादी तालुक्यांमध्ये रविवारी रात्रीपासून सोमवारी दुपापर्यंत अवकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. जिल्ह्यातील भातपीक काढून झालेले असल्यामुळे त्याला या पावसाचा फटका बसला नाही. पण नुकत्याच पडू लागलेल्या थंडीमुळे जिल्ह्यातील आंब्याच्या बागांमध्ये मोहोर फुटायला लागला आहे. या मोहोरावर कीडारोग व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होण्याची भीती आहे. तसेच अ‍ॅरथ्रॅक्सनोज, तुडतुडा, बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात, फेब्रुवारीच्या अखेरीस मिळणाऱ्या उत्पादनावर सावट निर्माण झाले आहे.

पालवी फुटलेल्या कलमांसाठी मात्र हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. कलमांच्या मुळाशी ओलावा निर्माण झाल्याने पालवी १५ दिवस आधी जून होणार आहे. या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात बंपर आंबा बाजारात येईल अशी अपेक्षा होती.

मात्र पाऊस पडलेल्या भागातील कलमांवरील पालवी लवकर जून होणार आहे. त्यानंतर थंडी पडली तर मोहोरही फुटेल. त्यातून उत्पादनही चांगले मिळू शकते. जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के कलमे पालवलेली आहेत. त्यांना याचा फायदा मिळणार आहे.

‘या पावसाचा मोहोरावर विपरीत परिणाम होणार असून कीडरोगांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. झाडांची पालवी जून होण्यासाठी तो पथ्यावर पडणार आहे. त्याचा बागायतदारांना फायदा होईल. मात्र त्याचा कालावधी लांबला तर मोठे नुकसान होऊ शकते.’

-राजेंद्र कदम, बागायतदार