प्रसिद्ध अर्नाळा किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. या किल्ल्याचा वापर स्थानिकांकडून मासे सुकविण्यासाठी होऊ लागला आहे.   त्याच्या दुर्गंधीमुळे किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो तसेच किल्ल्याचे पावित्र्य नष्ट होत असल्याची खंत पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

विरार पश्चिमेच्या अर्नाळा समुद्रातील बेटावर अर्नाळा  किल्ला पेशवेकालीन आहे.  १७३७ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातून पेशव्यांनी बेट काबीज केल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा बेटावर शंकराजीपंत फडके यांच्यामार्फत नव्याने हा भक्कम किल्ला बांधून घेतला होता. हा किल्ला ७०० चौ. इतक्या क्षेत्रफळात पसरला असून तटबंदीची उंची साधारणत: २५ ते ३० फूट आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये भैरव, भवानी आणि बावा हे तीन बुरूज असून त्र्यंबकेश्वर व भवानीदेवीचे मंदिरदेखील इथे स्थापित केले गेले आहे.  अभ्यासक आणि पर्यटक हा किल्ला बघण्यासाठी येत असतात. मात्र देखभाल होत नसल्याने या किल्ल्याची दुरवस्था झाली आहे.  गावातील मच्छीमार किल्ल्याचा वापर मासे सुकविण्यासाठी करत आहेत. किल्ल्याच्या आवारात तसेच बुरुजावर बोंबील, झिंगे आदी मासे सुकण्यासाठी पसरवून ठेवलेले आढळून येतात. बुरूज आणि तटबंदीवर असे मासे सुकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. त्याची दुर्गंधी किल्ल्यात पसरलेली असते. किल्ल्यात येणारे इतिहास अभ्यासक आणि पर्यटकांना त्याचा त्रास होत असतो. आधीच किल्ल्याची दुरवस्था झाली आहे, त्यात आता मासे सुकवले जात असल्याने किल्ल्याचे महत्त्व लोप पावत चालले असल्याची तक्रार किल्ल्यात आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

सूचनेकडे दुर्लक्ष

अर्नाळा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतो. किल्ल्यात मद्यपान करण्यास तसेच मासे सुकविण्यासाठी बंदी आहे. याबाबत अर्नाळा किल्ला गावाचे सरपंच चंद्रकांत मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा प्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.  आम्ही वारंवार नागरिकांना सूचना देत असतो की, किल्ल्याचे पावित्र्य जपले पाहिले. मात्र कारवाईनंतरही मासे सुकवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.