वसई : वसई विरार शहरात तीन दिवसांपासून प्राणवायूचा पुरवठाच झाला नसल्याने शहरात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. रायगड येथून प्राणवायू आणण्यासाठी टँकर उपलब्ध नसल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. प्राणवायूअभावी रुग्ण दगावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी उशिरापर्यंत १० टन प्राणवायूचा साठा शहरात दाखल होत आहे. हा साठादेखील जेमतेम दोन दिवस पुरेल इतकाच असणार आहे. वसई विरार शहरात करोना संसर्गाचा प्रसार झपाटय़ाने होऊ  लागला आहे. दिवसाला सरासरी पाचशे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शहरातील करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात खाटा मिळेनाशा झाल्या आहेत. दुसरीकडे करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन)ची गरज लागते. मात्र शहरात प्राणवायूचाच मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे.  मागील तीन दिवसांपासून शहरात प्राणवायू घेऊन येणारे टँकरच आले नसल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे. रायगड येथील जीएसडब्ल्यूच्या फिलिंग स्टेशन येथून प्राणवायू टँकरमधून आणला जातो. वसईतील गॅलेक्सी आणि स्पीड या दोन रिफिलिंग सेंटरमध्ये तो भरला जातो आणि तेथून तो रुग्णालयांना वितरित केला जातो. मात्र प्राणवायू नसल्याने गॅलेक्सी रिफिलिंग केंद्र बंद पडले आहे. सोमवारी जेमतेम काही तास पुरेल एवढाच प्राणवायूचा साठा शिल्लक आहे.

वसई विरार शहराला दररोज २० टन प्राणवायूची गरज आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून केवळ १० टन प्राणवायू येत आहे. त्यातच आता रायगडमधून येणारे टँकर बंद झाल्याने आधीच असलेल्या कमतरतेत मोठी भर पडली आहे.

सध्या दगावणारे रुग्ण प्राणवायूअभावी दगावले जात असल्याचा आरोप माजी महापौर राजीव पाटील यांनी केला आहे. नालासोपारा येथील एका खासगी रुग्णालयात माजी नगरसेवक किसन बंडागळे यांच्यासह तीन रुग्ण प्राणवायूअभावी दगावल्याचा आरोप त्यांनी केला.

शहरातील प्राणवायूची कमतरता भरून काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन महसूल विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याची माहिती पालघरच्या अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रवीण मुंदडा यांनी दिली. प्राणवायूची कमरता ही केवळ वसई विरारमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राला दिवसाला पंधराशे मेट्रिक टन प्राणवायूची गरज असताना केवळ बाराशे मेट्रिक टन एवढा प्राणवायू मिळतो. वसई विरार शहराला रायगड येथून प्राणवायू आणण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वसई विरार महापालिकेनेदेखील प्राणवायूची कमतरता असल्याचे सांगितले. प्राणवायू आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी पालिकेने गोरेगाव येथून १० टनाचा प्राणवायू मागवला आहे. तो सोमवारी उशिरापर्यंत शहरात दाखल होईल, असे पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले. मात्र हा साठादेखील दोन दिवस पुरेल एवढाच आहे. त्यासाठी इतर ठिकाणांहून प्राणवायू आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आयुक्तांनी सांगितले. वसईतील दोन्ही रिफिलिंग सेंटरवर प्रत्येकी ५ टन प्राणवायू दिला जाणार आहे.