खरेदीच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल

पालघर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या टाळेबंदीचा लाभ घेऊन पालघर नगर परिषदेने कार्यालयालगत असलेल्या भाजी बाजाराचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. आगामी काळात सामाजिक अंतर ठेवून नागरिकांना भाजीपाला खरेदी करणे सोयीचे ठरेल यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण बदल बाजारपेठेत करण्यात येत आहेत.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागल्यानंतर नगर परिषदेने  कार्यालयालगत असलेला भाजी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी काळात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याकरिता या भाजी विक्रेत्यांच्या दुकानाचा आकार निश्चित केला जाणार आहे.  टाळेबंदीच्या कालावधीत संपूर्ण भाजी बाजाराचे नूतनीकरण होणार असल्याने  आगामी काळात येथे स्वच्छता राखण्यास नगर परिषदेला सोयीचे ठरणार आहे. पालघर रेल्वे स्थानकाबाहेर पहाटेच्या वेळी भरणारा घाऊक भाजी बाजार नंडोरे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे.  त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था व होणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यास सोयीचे पडत आहे. पालघर-मनोर मार्गावर भरणारा मासळी बाजार पूर्वेकडील कृषी उत्पन्न बाजार समितीने जनावरांच्या बाजारासाठी उभारलेल्या शेडमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. रेल्वेवर असणारा पादचारीपूल नागरिकांसाठी खुला होण्याची प्रतीक्षा  आहे.  या संदर्भात आवश्यक ती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या असलेल्या मासळी बाजाराचे नूतनीकरण किंवा विस्तार करण्यास रोड मार्जिन व विकास आराखडय़ातील निर्बंधांचा अडथळा येत असून त्या ठिकाणी  असलेली दुकाने आहे त्या स्थितीत सुरू ठेवण्याचे विचाराधीन आहे.

पालघर पश्चिमेला बाजारासाठी जागेचा शोध

एकीकडे शहराच्या पश्चिमे बाजूचा विस्तार  मोठय़ा प्रमाणात होत असताना नागरिकांच्या सोयीसाठी पालघर शहराच्या पश्चिमेच्या बाजूला नव्याने मासळी बाजार व भाजीपाला बाजार उभारण्याचे नगर परिषदेच्या विचाराधीन आहे. याकरिता जागेचा शोध घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जागेच्या उपलब्धतेनुसार  लवकरच नव्याने व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.