|| रमेश पाटील

कार्यरत अधिकारी अतिरिक्त भाराने त्रस्त; झाडलोट करण्याची वेळ

वाडा :  पालघर जिल्ह्यात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकार आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा वर्षानुवर्षे भरल्या जात नसल्याने सेवा विस्कळीत झाली आहे. तर अनेक दवाखान्यांतील सेवा ठप्प होत आहे.  तर दुसरीकडे  इतर  अधिकारी, कर्मचारी वर्ग अतिरिक्त भाराने मेटाकुटीला आला आहे. प्रसंगी दवाखान्यात अनेकांना झाडलोट करण्यासारखी कामेदेखील करावी लागत आहेत.

वाडा तालुक्यात एकूण १५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामधील काही दवाखान्यातील पशुविकास अधिकारी, साहाय्यक  पशुविकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व अन्य कर्मचारी अशी १४ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. याबाबत गारगांव गटाच्या रोहिणी शेलार यांनी वारंवार  करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येथील आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांत शिपाईच नसल्याने कार्यालयात झाडलोट करण्यापासून अन्य शिपाईंची कामे येथील पशुधन अधिकाऱ्यांनाच करावी लागत आहेत.

तालुक्यात कार्यरत  पशुविकास अधिकाऱ्यांकडे जव्हार व मोखाडा तालुक्यातील दोन, दोन पशु वैद्यकीय दवाखान्यांतील पदभार देण्यात आले आहेत. येथील पशुविकास अधिकाऱ्यांकडे अन्य ठिकाणचे पदभार असल्याने येथील दवाखान्यात येणाऱ्या पशू पालकांना आपल्या पशुधनावर कुठलेच उपचार न करता परत जावे लागत आहे.   अनेकदा  उपचाराअभावी पशुधनाला प्राणास मुकावे लागते. अनेकांना खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

पशुविकास अधिकारी यांच्या जागा शासनस्तरावरून नियुक्त केल्या जातात व पशुधन पर्यवेक्षकच्या जागा पालघर जिल्हा निर्मिती झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत जिल्हा भरती झालेली नाही. म्हणूनच या जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे. – डॉ. अजित हिरव,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.