गोंडवाना विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, श्री गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत येत असलेली तीसवर अभियांत्रिकी महाविद्यालये २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून कोकणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगडसोबत संलग्न होणार आहेत. विदर्भ व मराठवाडय़ातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संस्था संचालकांनी स्थानिक विद्यापीठातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत ऑनलाईन अर्ज भरून संलग्नता शुल्क जमा केले आहे.

विदर्भ व मराठवाडय़ातील काही मोजकीच महाविद्यालये सोडली तर बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था अतिशय वाईट आहे. यावर्षी तर बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयात निम्म्यापेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाकडे पाठ फिरविली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या लेखी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, श्री गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालय संचालित करणाऱ्या संस्थांना दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी अक्षरश: त्यांच्या घरापर्यंत पोहोचावे लागत आहे. ही भयावह स्थिती दरवर्षी अधिक कठीण परिस्थिती निर्माण करीत असल्याचे चित्र बघून ३० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी कोकणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगडसोबत संलग्न होण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालय संचालित करणाऱ्या संस्थाचालकांच्या संघटनांची काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी संलग्न होण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर एकेक अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थेशी जोडल्या गेले.

गेल्या वर्षी नागपूरचे एक अभियांत्रिकी महाविद्यालय या विद्यापीठाशी जोडल्या गेले. त्यानंतर यावर्षी संबंधित विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची एक चमू या सर्व विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेली. विद्यापीठासंदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर बहुसंख्य महाविद्यालयांनी या विद्यापीठाशी जुळण्याची प्रक्रिया सुरू झाली. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, बल्लारपूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट व श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणारा या तीन महाविद्यालयांनी याच वर्षी डॉ.आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न होण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे.

अर्ज व शुल्क जमा

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय संचालित करणाऱ्या सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे भरत पोटदुखे यांना विचारले असता संलग्नतेचा ऑनलाईन अर्ज व तीन लाख रुपये शुल्क जमा केल्याची माहिती दिली. तंत्रज्ञान विद्यापीठाची चमू बीआयटी येथे येऊन गेली. त्यांनी महाविद्यालयाचे निरीक्षण केल्यानंतर संलग्नता देण्याचे मान्य केले आहे. अर्ज व तीन लाख रुपये शुल्क जमा केले आहे. लवकरच विद्यापीठाचे पथक पुन्हा पाहणी करणार असल्याची माहिती बीआयटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी दिली. येत्या शैक्षणिक सत्रापासून लोणेरे विद्यापीठाशी जुळणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या तिन्ही संस्था संचालकांनी त्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालय गोंडवन विद्यापीठातून बाहेर पडत असल्याचे श्री साई अभियांत्रिकीचे प्रा.व्ही.एम.येरगुडे यांनी सांगितले.