मुसळधार पावसामुळे सुर्या नदीवरील कासा जुना पूल हा पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगाने सुरु आहे. दरम्यान, पाणी पुलावरुन जाणार असल्याचे लक्षात न आल्याने काही गुरं या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली आहेत. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
कासा जुना पूल या ब्रिटीशकालीन पुलावरुन वरोतीकडे जाणाऱ्या चार गुरांचा पुलाचा अंदाज चुकल्याने ती भांबावली आणि त्यांना परत मागे फिरता आले नाही, परिणामी ही गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, एकामागून एक निघालेल्या या गुरांपैकी एका गायीला मागे वळणे शक्य झाल्याने ती या जीवघेण्या प्रसंगातून वाचली. अतिवृष्टीमुळे तुंडुंब भरलेल्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे शुक्रावारी रात्री उघडण्यात आले. त्यातच मुसळधार पावसामुळे सुर्या नदीने धोक्याची पातळी अोलांडल्याने सुर्या नदीच्या तिरावरील गावांना सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 2:58 pm