|| मोहन अटाळकर

वरकरणी तटबंदी मजबूत दिसत असताना गढी आतून कुणीतरी पोखरावी आणि ती अचानकपणे ढासळावी, तसेच काहीसे विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या बाबतीत झाले आहे. भाजपला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळेल, अशी भाकिते राजकीय पंडितांकडून वर्तवली जात असताना निकालानंतर जे चित्र पुढे आले, त्यामुळे अनेक जण चक्रावले आहेत. अमरावती जिल्ह्यात जनाधार सुटत चाललेला दिसत असूनही वास्तवाचे भान न ठेवण्याचा फटका महायुतीला बसला आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपने आठपैकी चार जागांवर विजय मिळवून मुसंडी मारली होती. यावेळी त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागले, शिवसेनेला तर एकही जागा जिंकता आली नाही. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्वही आता उरलेले नाही. मुळात जिल्ह्यात महायुतीतील दोन्ही पक्ष सोबत लढलेच नाहीत. भाजप आणि शिवसेनेत नेत्यांची बिलकूल कमतरता नाही. परंतु या नेत्यांमध्ये एकसंघाऐवजी गटागटाने पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. लोकसभा निवडणुकीत सर्वत्र भाजपमय वातावरण असताना अमरावतीतून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समर्थित नवनीत राणा यांना विजय मिळाला, तेव्हाच भाजप-सेनेच्या नेत्यांना पुढे काय वाढून ठेवलेले आहे, याचा अंदाज यायला हवा होता, पण परस्परांना सहकार्य करण्याऐवजी नेत्यांमध्ये जुने हिशेब चुकते करण्याची अहमहमिका लागली आणि त्याचा लाभ काँग्रेसला मिळाला.

मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या प्रचार सभेत पुढल्या पन्नास वर्षांत एकही खड्डा पडणार नाही, असे रस्ते बनविल्याचा दावा केला खरा, पण पक्षसंघटनेत पडलेले खड्डे अनेकांना दिसले नाहीत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांनी राजकारणासाठी नवीन व्यासपीठ निवडले. दोन सलग पराभवांनी खचून न जाता सुलभा खोडके यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर अल्पकाळात मोर्चेबांधणी केली आणि विजय मिळवला.

 

राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव धक्कादायक ठरला. कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले, विरोधात दमदार उमेदवार नाही, सारे काही अनुकूल वाटत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या देवेंद्र भुयार यांनी त्यांचा पराभव करणे हा सरकारसाठी ‘काव्यगत न्याय’ ठरला आहे.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांना आपला गड शाबूत ठेवण्यात यश मिळाले खरे, पण धामणगावात वीरेंद्र जगताप यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसमधील असंतुष्टांनी त्यांच्या पराभवासाठी हातभार लावला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जिल्ह्यात पाच जागांवर विजय मिळाला आहे. स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार आणि बडनेरातून तिसऱ्यांदा निवडून आलेले रवि राणा यांनी हे यश उजळून काढले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी विजय मिळवतानाच आपल्या पक्षाची ताकद वाढवली आहे. दोघेही नेते आक्रमक आहेत. जनतेच्या प्रश्नांसोबत त्यांनी स्वत:ला खिळवून ठेवले. जनतेने त्यांना निवडले. दर्यापुरातून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा झालेला विजय हा जातीय मतविभागणीचे आडाखे बांधणाऱ्यांसाठी धक्का मानला जाईल. त्यांच्या निवडीने दर्यापुरातील ‘प्रकाश भारसाकळे पॅटर्न’ मोडीत निघाला आहे.

भाजपला या मतदारसंघातील मतप्रवाह ओळखता आला नाही. मेळघाटात नवीन उमेदवार देऊनही भाजपला यश मिळवता आलेले नाही. शिवसेनेचे तीनही उमेदवार नवखे होते, त्यांच्याकडून फार अपेक्षा जरी नसल्या, तरी शिवसेनेचा लढाऊ बाणा दिसलाच नाही.

महायुतीला जमिनीवर आणण्यासोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे हे निकाल आहेत.