दिवाळीसाठी आपापल्या गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात येत असल्या, तरी विदर्भाच्या बाबतीत मात्र हात आखडता घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात सोडल्या जाणाऱ्या सुमारे १७ हजार ५५० बसगाडय़ांपैकी विदर्भाच्या वाटय़ाला केवळ १६५० बसगाडय़ा आल्या आहेत.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर एस.टी. महामंडळातर्फे १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरातून १७ हजार ५५० जादा बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वाधिक ४ हजार ७०० जादा गाडय़ा औरंगाबाद विभागातून सोडण्यात येत आहेत. त्या खालोखाल पुणे विभागातून ४ हजार ५७५, नाशिक विभागातून ३ हजार ३७५, मुंबई विभागातून ३ हजार २५० जादा बसगाडय़ांची संख्या आहे. नागपूर विभागातून फक्त ७७५ आणि अमरावती विभागातून सर्वात कमी म्हणजे २४० बसगाडय़ा सोडल्या जात आहेत. विदर्भातील सर्वच प्रमुख एस.टी. बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. सकाळपासूनच बसगाडय़ांच्या प्रतीक्षेत लोक रांगा लावून असतात, पण नियमित बसफेऱ्यांखेरीज जादा गाडय़ा त्यांच्यासाठी उपलब्धच नाहीत. विदर्भासारख्या मोठय़ा भूभागासाठी एस.टी. महामंडळाने केवळ १६५० गाडय़ा देऊन आपली जबाबदारी झटकून टाकली आहे.
गेल्या वर्षीही दिवाळीत विदर्भाला केवळ एक हजार जादा बसगाडय़ा पुरवून बोळवण करण्यात आली होती. दिवाळीपूर्वी पुण्याहून विदर्भात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यांच्यासाठी यावेळीही जादा बसेस सोडण्यात येत आहेत. याशिवाय, प्रवाशांची मागणी विचारात घेऊन दिवाळीत शिवाजीनगर, पुणे ते नागपूर दरम्यान वातानुकुलित शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली आहे. ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना १ हजार ९५९ रुपये मोजावे लागत आहेत. सामान्य एस.टी. प्रवासापेक्षा या बसचे भाडे अधिक असले, तरी या बसला प्रवाशांनी पसंती दिली आहे. खाजगी प्रवासी बसेसचेही भाडे दिवाळीत वाढले आहेत. ते अडीच ते तीन हजारापर्यंत पोहोचले आहे. अनेक खाजगी बसगाडय़ा या मार्गावर धावत असताना एस.टी.ने एकच वातानुकुलित बससेवा सुरू करावी, याचे आश्चर्य प्रवाशांमध्ये आहे. या बसचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध होत असले, तरी त्यात अडचणी येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

दुजाभावाची चर्चा
दिवाळीत गर्दीचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या मार्गावर जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात असते. प्रवाशांच्या मागणीचा आधार त्यासाठी घेतला जातो, असे एस.टी. महामंडळातील सूत्रांनी सांगितले, पण विदर्भात दिवाळीनिमित्त जादा बसगाडय़ा सोडण्याची मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, हा प्रश्न आहे. भाऊबीजेनंतर प्रवाशांची मोठी गर्दी एस.टी. बसस्थानकांवर होते. त्यांच्यासाठी लांब पल्ल्याच्या आणि कमी अंतराच्या दोन्ही प्रकारच्या जादा बसगाडय़ा उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही विदर्भाच्या बाबतीत झालेला हा दुजाभाव चर्चेचा विषय बनला आहे.