18 January 2018

News Flash

Vijayadashami 2017: …म्हणून साजरा केला जातो दसरा

झेंडूची फुले आणि आपट्याच्या पानांचे विशेष महत्त्व

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 30, 2017 9:00 AM

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं म्हणत विजयादशमीचं अतिशय आनंदाने स्वागत केलं जातं. देवीने महिषासूर या राक्षसाचा वध या दिवशी केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते. साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाचे देशभरात विशेष महत्त्व आहे. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची असे या दिवसाचे खास महत्त्व.

या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची पद्धत आहे. यावेळी ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा’ असे म्हटले जाते. त्यांच्या पाया पडायचे आणि आशीर्वाद घ्यायचे अशी परंपरा आहे. याशिवाय कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे देवीला जाण्याचाही प्रघात आहे. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी रावणाच्या प्रतिकृतीच्या दहनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत म्हणून या दिवशी संध्याकाळी सीमोल्लंघन म्हणजेच वेशीच्या बाहेर देवाला जाऊन येण्याची पद्धत आहे.

First Published on September 30, 2017 9:00 am

Web Title: vijayadashmi 2017 reason behind celebration festival special
  1. No Comments.