सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे साहित्य व कला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. सुधीर रसाळ (औरंगाबाद) यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉ. रवींद्र शोभणे (नागपूर) यांना, तर कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत (मुंबई) यांना जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्काराचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
पुरस्कार समितीचे सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज, गुरुवारी पत्रकारांना याविषयी माहिती दिली. या वेळी समितीचे सदस्य डॉ. गोपाळराव मिरीकर व डॉ. राजेंद्र सलालकर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कारार्थीची निवड केली. पुरस्कार वितरण दरवर्षीप्रमाणे विखे यांच्या जयंतिदिनी (२९ ऑगस्ट) प्रवरानगर येथे दुपारी अखिल भारतीय साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. बाळासाहेब विखे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार ५१ हजार रु., स्मृतिचिन्ह व कलागौरव पुरस्कार २५ हजार रु. स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा आहे. याशिवाय हभप बद्रिनाथ महाराज तनपुरे (पंढरपूर) यांना समाजप्रबोधन पुरस्कार (२५ हजार रु., स्मृतिचिन्ह), श्रीनिवास भणगे यांना नाटय़ सेवा पुरस्कार (२५ हजार रु., स्मृतिचिन्ह), प्रा. डॉ. एकनाथ ढोणे (श्रीरामपूर) यांच्या ‘लोकहितवादींची शतपत्रे’ या समीक्षाग्रंथाला जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (१० हजार रु., स्मृतिचिन्ह), संजीव तनपुरे (राहुरी) यांच्या ‘लपवलेली वही’ या काव्यसंग्रहास प्रवरा परिसर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (७ हजार रु., स्मृतिचिन्ह) प्रदान केले जाणार आहेत.