ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आज, शनिवारी पारनेर-शिरूर रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. नायब तहसीलदार दत्तात्रय भावले यांना निवेदन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलनानंतर संत यादवबाबात मंदिराच्या प्रांगणात साखळी उपोषण, घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला.

सकाळी ग्रामस्थांनी यादवबाबा मंदिरापासून पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान हजारे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. हाती तिरंगा घेतलेले तरुण-तरुणींसह महिलाही या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. पदयात्रा पारनेर-शिरूर रस्त्यावरील चौकात पोहोचल्यानंतर तेथे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. रस्ता अडवल्याने तासभर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या वेळी बोलताना माजी सरपंच जयसिंग मापारी म्हणाले, सरकार अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेच न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने देशभर आंदोलने करण्यात येत आहेत. असे असतानाही सरकारकडून मात्र काहीही प्रतिसाद मिळत नसून उलट आंदोलनात खोडा घालण्याचा प्रयत्न होतो आहे. दिल्लीच्या आंदोलनाकडे जाणाऱ्या नागरिकांना रोखण्यात येत आहे. पोलिसांची दडपशाही करण्यात येत आहे. हजारे यांनी केलेल्या मागण्या या त्यांच्या वैयक्तिक नसून देश व समाजहिताच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांची भूमिका हुकूमशहास साजेशी असून न्याय मिळेपर्यंत राळेगणसिद्धी परिवार माघार घेणार नसल्याचे ते म्हणाले.

उपसरपंच लाभेश औटी म्हणाले, वयाच्या ८० व्या वर्षी अण्णा समाज व देशहितासाठी उपोषणास बसले आहेत. सरकारची दखल घेणार नसेल तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करून शासनास आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडू. आंदोलनानंतर आंदोलक पुन्हा यादवबाबा मंदिराच्या प्रांगणात फेरीने गेले. तेथे बेमुदत उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांबरोबर नागरिकांनी साखळी उपोषणास तसेच घंटानाद आंदोलनास प्रारंभ केला. दिवसभर जिल्हा तसेच जिल्ह्य़ाबाहेरील नागरिकांनी राळेगणसिद्धीस भेट देऊन अण्णांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.