सांसद आदर्श ग्राम योजनेतून दिवेआगरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केले. दिवेआगर ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे आयोजित सांसद आदर्श ग्राम योजनेच्या शुभारंभप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना अनंत गीते म्हणाले की, जगामध्ये अनेक राष्ट्रे विकसित झाली असून त्यांच्या बरोबरीने जायचे असेल, तर ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. जोपर्यंत खेडय़ाचा व गावाचा विकास होणार नाही तोपर्यंत राष्ट्राचा विकास होणार नाही. केवळ गाव आदर्श होऊन चालणार नाही, तर गावकऱ्यांच्या मानसिकतेतही बदल होणे आवश्यक आहे आणि हे काम गावकऱ्यांना स्वत: करावे लागणार आहे. आदर्श गाव योजना राबवीत असताना निधीची कमतरता पडणार नाही. या योजनेमुळे भविष्यात आपली ओळख विकसित राष्ट्र म्हणून होणार आहे. दिवेआगर हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. भौतिक, नतिक आणि आíथक विकास या तीन गोष्टी योजनेचे मुख्य भाग आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रम असून ते ग्रामीण भागाशी निगडित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०१६ पर्यंत हे गाव आदर्श होईल अशी प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी ग्वाही देऊन हे गाव आदर्श होणारच, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासन दिवेआगरच्या विकासात्मक कामासाठी सदैव सहकार्य करील. दिवेआगर आदर्श ग्राम कसे होईल, हे पाहावे असेही ते या वेळी म्हणाले. निसर्गसौंदर्याने नटलेले, पर्यावरणरत्न आणि तंटामुक्त असलेले हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आदर्श गाव करण्यासाठी गावकऱ्यांनी मनातून काम करून सहभाग घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या वेळी सांसद आदर्श ग्राम संकल्पनेबाबत जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. स्वागतगीताने तसेच दीपप्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच या वेळी मंत्री महोदयांच्या हस्ते जनधन योजनेअंतर्गत पासबुक व क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले.
या वेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख रवी मुंढे, पंचायत समिती सभापती देवीदास कावळे, जिल्हा परिषद सदस्य श्यामकांत भोकरे, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, बँक ऑफ इंडियाचे झोनल ऑफिसर श्री. बिसोई, श्रीवर्धनचे तहसीलदार जी. एम. बारी, लिड बँकेचे व्यवस्थापक टी. मधुसूदन, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2015 रोजी प्रकाशित
सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा – अनंत गीते
सांसद आदर्श ग्राम योजनेतून दिवेआगरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केले.

First published on: 07-01-2015 at 03:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers participated important in mp model village scheme