मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा यशस्वी पार पडल्याने व त्यांनी कोकणाला भरभरून दिल्यानेच नारायण राणेंचा जळफळाट होत असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्याच्या कोकण दौऱ्यावर राणेंनी टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणांपलीकडे कोकणाला काहीही दिले नाही, असं राणे म्हणाले होते. तर, राणेंच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे येथील विकास रखडला असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.

कणकवली येथे पत्रकारपरिषद घेऊन राऊत यांनी राणेंनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतला. राणेंकडून विकासकामांमध्ये अडचणी निर्माण करण्याचे काम होत असल्याचे सांगत, मुख्यंत्र्यांचा कोकण दौरा यशस्वी झाला असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गमधील अनेक प्रश्न मार्गी लागले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर,  सी-वर्ल्डसह चिपी विमानतळ हे प्रकल्प रखडण्यास नारायण राणेच जबाबदार आहेत. शिवाय, कोणकणातील अनेक छोटेमोठे प्रकल्प देखील राणेंच्या काळातच रखडले असल्याचाही राऊत यांनी यावेळी आरोप केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा कोकण दौरा केला. मात्र या दौऱ्यात त्यांनी कोकणाला काहीही दिले नाही. त्यांचा सगळा दौरा हेलिकॉप्टरने होता. रत्नागिरीच्या नाणार प्रकल्पाविषयी त्यांनी एकही शब्द काढला नाही अशीही टीका राणेंनी केली होती.

“कोकणात मच्छिमारांची उपासमार होते आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. वृत्तपत्रांनी दोन दिवस त्यांना नाहक प्रसिद्धी दिली. मी विरोधाला विरोध करायचा म्हणून बोलत नाही. मी कोकणी माणसासाठी बोलतो आहे. कोकणासाठी आणि कोकणी माणसासाठी उद्धव ठाकरेंचे योगदान काय? असाही प्रश्न नारायण राणेंनी यावेळी उपस्थित केला होता.

“सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी ओळखला जातो. मात्र या जिल्ह्याला किती निधी मिळाला तेदेखील उद्धव ठाकरेंनी सांगितले नाही. कोणत्याही योजनेला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला नाही. कोकणासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसून मुख्यमंत्री परत गेले.” अशीही टीका नारायण राणेंनी केली होती.