ज्येष्ठ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
महाराष्ट्राच्या व्यासंगी वक्तृत्व परंपरेला चालना देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रे षु’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तत्व स्पर्धेच्या नगर केंद्रावर याही वर्षी राहुरी येथील पदव्युत्तर कृषी महाविद्यालयाने बाजी मारली. येथील अंतिम फेरीत या महाविद्यालयाची विनया दिलीप बनसोडे विजेती ठरली असून दि. १४ ला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत तिने प्रवेश केला आहे. या फेरीचे पारितोषिक वितरण बुधवारी ज्येष्ठ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या नगर विभागीय केंद्राची अंतिम फेरी बुधवारी जल्लोषात पार पाडली. विनया बनसोडे हिने चषक, पाच हजार रूपये व प्रमाणपत्र असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नगर केंद्रावरील प्राथमिक फेरीत २८ स्पर्धक सहभागी झाले होते. यातील आठ जणांची नगर केंद्रावरील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. ही फेरी बुधवारी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडली. डॉ. देवदत्त रानडे व प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेत जिंकणे महत्वाचे आहे, मात्र जिंकण्यासाठीच सर्व काही केले पाहिजे असे नाही, मनाला होणारा आनंद जिंकण्यापेक्षा मोठा आहे, असे ज्येष्ठ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.राज्यातील आठ केंद्रावर सुरू असलेल्या या स्पर्धेला ‘जनता सहकारी बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’ व ‘इंडियन ऑईल’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ व ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत.

विभागीय अंतिम फेरीचा निकाल प्रथम क्रमांक- विनया बनसोडे
द्वितीय क्रमांक- अमोल शिवाजी राठोड (न्यू आर्टस कॉलेज, शेवगाव)
तृतीय क्रमांक- स्नेहल राजेंद्र ठाणगे (अहमदनगर महाविद्यालय, नगर)
उत्तेजनार्थ- रोहिणी रामराव हुजरे (डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी) आणि निलिमा बाळकृष्ण नानकर ( के. जे. सोमय्या महाविद्यालय कोपरगाव)