पाहणी दौरे, दिशा अ‍ॅप प्रशिक्षण शिबिरे, शाळांच्या वार्षिक तपासणी भेटीचे आयोजन

पालघर : पालघर जिल्ह्यातील काही आश्रमशाळा व खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून करोनाचा मोठा प्रसार झाल्याची उदाहरणे ताजी असताना राज्य शासनाने ५ एप्रिलपासून अमलात आणलेल्या नवीन निर्बंधांचे जिल्हा शिक्षण विभागाने उल्लंघन केल्याचे प्रकार घडकीस आले आहेत. शिक्षण विभागाकडून पाहणी दौरे, दिशा अ‍ॅप प्रशिक्षण शिबिरे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वार्षिक तपासणी भेटीचे आयोजन केले जात आहे. अशा शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षक समुदाय व कर्मचारी सहभागी होताना दिसून आले आहेत. निर्बंध सर्वांसाठी समान असताना शिक्षण विभागात निर्बंध पाळले जात नाहीत.

जिल्ह्यात मनाई आदेश, जमावबंदी आदेश लागू असताना विक्रमगड तालुका शिक्षण विभागाने तालुक्यातील २५३ शाळांतील मुख्याध्यापकांचे ई-दिशा अ‍ॅपचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यक्रमांवर बंदी असतानाही प्रशिक्षणाचा घाट का घातला जात आहे, हे न कळणारे आहे.

जिल्ह्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक- कर्मचारी यांना बाधा झालेली असल्याचे शिक्षक विभागाला माहीत असतानाही अशी प्रशिक्षणे आयोजित केली जात आहेत. हे प्रशिक्षण घेताना शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य दिले नव्हते. ज्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले होते त्या वर्गखोल्यामध्ये निर्जंतुकीकरणही केले नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण घेताना ५० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी संख्या होती तसेच प्रशिक्षणादरम्यान कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतरही ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे असे प्रशिक्षण आयोजित करून इतरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन स्वत: प्रशासकीय यंत्रणा करीत नसतील तर प्रशासनाने सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात, असा सवाल उपस्थित झाला आहे.

विक्रमगडमध्ये पाच ठिकाणी प्रशिक्षण

विक्रमगडमध्ये हे प्रशिक्षण पाच ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये २५३ प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी ठेवण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा दादडे, विक्रमगड, डोलारे खुर्द, चिंचघर (केव, भोपोली, दहरजे), पोचाडे (साखरे, वाकी, वास्ते) खडकी (खडकी कुंजे, कर्हे तलावली, आलोंडे (वसुरी, झडपोली, ओंदे) केंद्राचा समावेश होता. एका केंद्रामध्ये १५ शाळांचा समावेश आहे.

३० एप्रिलपर्यंत अभ्यागतांना प्रवेशबंदी

शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांमध्ये भेटी देण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना ३० एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी असल्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत. अतिमहत्त्वाचे काम असल्यास अभ्यागतांनी  फळ-ढउफ टेस्ट करून तसेच स्क्रीनिंग करूनच कार्यालयात प्रवेश करावा किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींमध्येही निर्बंधांचे पालन व्हावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. – चंद्रकांत वाघमारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर