चळवळींमधून समाजात प्रेरणा निर्माण करण्यात योगदान देणारे गीतकार विष्णू शिंदे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने, स्त्री चळवळ पुढे नेण्यासाठी योगदान देणाऱ्या ऊर्मिला पवार यांना क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या नावे, तर महिलांना प्रोत्साहित करणारे चंद्रकांत वानखेडे यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने येथे दलित अस्मिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. येथील अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे हे पुरस्कार दिले जातात.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अभिताभ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद चौधरी, तर अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र भालेराव हे उपस्थित होते. याप्रसंगी विष्णू शिंदे यांनी मनोगतात फुले, शाहू, आंबेडकरांच्या समता चळवळीत कलावंतांचेही मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. समाजाने या चळवळीतील कलावंतांचे कौतुक करताना त्यांच्या उदरनिर्वाहाकडे बघण्याची सूचना त्यांनी केली. चंद्रकांत वानखेडे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करताना बेशरमांना पाहून सज्जन माणूसही हळहळतो, अशी व्यथा मांडली. चांगुलपणाला मरण नाही अशी दृढ श्रद्धा असली तरी चांगुलपणाला परीक्षेतून जावे लागते असे ते म्हणाले. ऊर्मिला पवार यांनी स्त्रीमुक्ती चळवळीमुळे स्त्री-पुरुष समानता आणि मुक्त संचार करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे नमूद केले. निसर्गाने घडविलेल्या समानतेच्या या ताकदीने समाजाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी चार भिंतीमध्ये महिलांना डांबून न ठेवता त्यांना मुक्त संचार करू दिला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुरेखा पालवे यांनी केले. आभार आम्रपाली भालेराव यांनी मानले.