निवडणूक आयोगाच्या अ‍ॅपचा असाही उपयोग

सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार टळावेत आणि निवडणुका अधिक पारदर्शी, निष्पक्ष व्हाव्यात यासाठी आयोगाने मतदारांसाठी ‘सिव्हिजल’ अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर तक्रारी आल्यास त्यांचे १०० मिनिटांत निराकरण करण्यात येणार आहे. सांगलीत मात्र एका मतदाराने या अ‍ॅपवर तक्रारीऐवजी सेल्फी अपलोड करीत स्वतला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर एकाने रिकाम्या शासकीय कार्यालयातील रिकाम्या खुर्च्याचे छायाचित्र अपलोड करून, कोण काम करतेय की नाही, असा सवाल उपस्थित केला.

सार्वत्रिक निवडणूक म्हणजे एक प्रकारची जत्राच म्हटली जाते. या जत्रेत हौसे, गवसे, नवसे असतातच, मात्र या जत्रेला आचारसंहितेच्या चौकटीत बसविण्यासाठी आयोगा अनेक उपाय योजतो. आयोग सध्याच्या तंत्रस्नेही युगात अ‍ॅपचा वापर करीत आहे.

आचारसंहिता भंगाच्या प्रकारावर लक्ष ठेवण्यात नागरिकांनी थेट सहभागी व्हावे  यासाठी ‘सिव्हिजल’ अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आचारसंहिता भंग करणारी आक्षेपार्ह छायाचित्रे, व्हिडीओ त्यावर टाकता येतात. तक्रार दाखल झाल्यापासून १०० मिनिटांत निपटारा करण्याचे बंधन आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून १३ तक्रारी अ‍ॅपवर आल्या. त्यातील पाच निर्थक होत्या. उर्वरित आठपैकी सहा तक्रारी सांगलीतून तर दोन मिरजेतून दाखल झाल्या. एका मतदाराने सेल्फी अपलोड केला होता, तर एका तक्रारीत शासकीय कार्यालयातील रिकाम्या खुर्च्याचे छायचित्र अपलोड  केले होते. परंतु निर्थक तक्रारी डिलिट करण्यात आल्या.

आचारसंहिते नंतर महापालिकेने कामांची एक निविदा प्रसिद्ध केली. त्यामुळे आचारसंहिताभंग झाल्याची तक्रार अ‍ॅपवरून आली. ही निवदा रद्द करण्यात आली असल्याचे अ‍ॅपचे जिल्हा समन्वयक तथा नोडल अधिकारी म्हेत्रे यांनी सांगितले.