कल्पेश भोईर

अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; पालकांना धास्ती

पुढील शैक्षणिक वर्षांसाठी अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे आपल्या पाल्याला ज्या शाळेत प्रवेश घेणार आहोत ती शाळा अधिकृत की अनधिकृत, असा प्रश्न पालकांना पडलेला आहे. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर शिक्षण विभागाकडून यादी प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे आर्थिक आणि पाल्याचे शैक्षणिक नुकसान होते, असा आरोप काही पालकांनी केला आहे.

वसई-विरारसह पालघर जिल्ह्य़ात अनेक शाळा अनधिकृत आहेत. या शाळांना शिक्षण विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसते. या शाळांबाबत माहिती नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होते. बोगस कागदपत्राचा वापर करून अशा स्वरूपाच्या शाळा सर्रास चालवल्या जात आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांची पट संख्या कमी असल्याचे कारण देत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असून दुसरीकडे अनधिकृत शाळा वेगाने फोफावू लागल्या आहेत. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात येते. मात्र ही यादी उशिरा प्रसिद्ध होते. तोपर्यंत पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतलेला असतो. प्रवेश घेतलेली शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर झाल्यानंतर पालकांचे आर्थिक नुकसान तर होतेच, मात्र अन्य शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याने पाल्याचेही शैक्षणिक नुकसान होते. अशा प्रकारच्या अनधिकृत शाळांना वेळीच लगाम घालणे गरजेचे आहे, असे भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुशांत पाटील यांनी सांगितले.

जनजागृतीची मोहीम

जिल्ह्यातील अनधिकृत शाळांना लगाम लावण्यासाठी आणि पालक व विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होऊ  नये यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करणे, फलकबाजी करून जनजागृती करणे, ज्या शाळा अनधिकृत आहेत, त्या शाळेसमोर कोणी प्रवेश घेऊ  नये अशा स्वरूपाच्या नोटिसा लावणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या शाळांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येत असते, अशी माहिती कंकाळ यांनी दिली.

कारवाईचे काय झाले?

गेल्या वर्षी शिक्षण विभागाच्या वतीने पालघर जिल्ह्यातील १९९ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. त्यापैकी १६० शाळा वसई-विरार शहरातील होत्या. ही यादी जाहीर झाल्यानंतर शाळांवर कारवाई करण्यात आली असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. मात्र अद्यापही काही शाळा सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या शाळांना कारवाई करून यंदाच्या हंगामातील यादी शिक्षण विभागाने लवकर जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला शालेय प्रवेशाच्या वेळी यादी प्रसिद्ध करण्यात येत असते. अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच कारवाई करण्यात येते. याबाबतची जनजागृती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार आहे.

राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी, पालघर

सध्या जिल्ह्यात शिक्षणाचे बाजरीकरण होऊ  लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असते. यासाठी अनधिकृत शाळांची यादी शिक्षण विभागाने लवकर जाहीर करून त्याबाबतचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावून जनजागृती करावी.

– सुशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते