राज्य मंत्रिमंडळात मराठवाडय़ातील अब्दुल सत्तार व अमित देशमुख या दोघांना लाल दिवा मिळाला असला, तरी त्याचे सुख मात्र पदरी पडेल का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्याने मराठवाडय़ात या दोघांनाही आणखी काही दिवस लाल दिव्याचे सुख मिळणार नाही. अत्यंत कमी कालावधीसाठी हे पद मिळाल्याने या दोघांना राजकीयदृष्टय़ाही फायदा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
अब्दुल सत्तार यांच्या प्रवेशामुळे अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन वाढल्याचा संदेश मात्र दिला गेला, तर विलासराव देशमुखांच्या वारशाला काँग्रेसने वाऱ्यावर सोडले नाही, असेही अधोरेखित झाले.
सत्तार यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर सिल्लोड मतदारसंघात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळात समावेशासाठी सत्तार सर्व प्रकारचे प्रयत्न करीत होते. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बाबुराव कुलकर्णी यांची उमेदवारी कापून ती सुभाष झांबड यांना मिळावी, या साठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नितीन पाटील यांच्या नावासाठीही सत्तार यांचा आग्रह होता. सत्तार यांचा शब्द म्हणजे अशोक चव्हाण यांचा शब्द, असे मानण्याइतपत राजकीय वातावरण निर्मिती ते करीत. परिणामी, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना सत्तार यांचा शब्द डावलणे अवघड जात. याच कालावधीत वेगवेगळे महोत्सव घेऊन नेत्यांनी आपल्या मतदारसंघात आले पाहिजे, असा आग्रहही सत्तार यांनी धरला होता. मंत्रिपद मिळावे, असा आग्रह ते वारंवार करीत.
जिल्हा परिषद निवडणुकीतही सत्तार यांनी कार्यकर्त्यांना बळ दिल्याचे वातावरण निर्माण केले होते. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्य समाजाने केलेले मतदान गृहीत धरून सत्तार यांना मंत्रिपद मिळावे, असा आग्रह धरला जात होता. मात्र, मिळालेल्या मंत्रिपदाचा लाभ किती व कसा होईल, या विषयी शंका घेतल्या जात आहेत. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपताच अवघ्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे कोणते निर्णय राजकीय फायद्याचे ठरतील, याचा विचार करायलादेखील फुरसत मिळेल का, असा सवालही केला जात आहे.
राज्यमंत्री म्हणून अमित देशमुख यांचा शपथविधी झाला असला, तरी कमी कालावधीसाठी मिळालेला लाल दिवा लातूरकरांसाठी सुखाचा असेल का, हे सांगणे मात्र अवघडच झाले आहे. या निर्णयामुळे विलासरावांच्या माघारी त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणाला तरी एकाला मंत्रिपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली असली तरी या मंत्रिपदाचा उपयोग होईल, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.