महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना फक्त तीनच अर्ज आल्याने प्रभाग समिती अ, ब व क या तिन्ही प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध होणार आहे. राष्ट्रवादीसोबत काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळल्याने या निवडीत काँग्रेसला सभापतिपद मिळाल्याचे दिसते.
महापालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जुलाला, स्थायी समिती सभापती विजय जामकर ही तिन्ही मुख्य पदे राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेसची संख्या चांगली असताना सत्ता स्थापनेच्या वेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. मनपातील कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेतले नाही; पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करून आघाडीचा धर्म प्रत्येक वेळी पाळला जावा, अशी मागणी केली. याचा परिणाम म्हणून मनपा प्रभाग समिती सभापती निवडताना महापौर देशमुख यांनी काँग्रेसला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी प्रभाग समिती सभापती निवडीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या वेळी प्रभाग समिती अ काँग्रेसला व ब आणि क राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
‘अ’साठी आशा नर्सीकर, ‘ब’साठी रुखसाना बेग रौफ खान आणि ‘क’साठी अर्चना नगरसाळे यांनी अर्ज भरला. तिन्ही प्रभागांसाठी एकमेव अर्ज आल्याने सभापती निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. शिवसेना-भाजपचे संख्याबळ कमी असल्याने त्यांनी सहभाग घेतला नाही.