शहरात प्रभाग तर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती कार्यान्वित

यवतमाळ : करोनाचा प्रादुर्भाव आता शहरांसह ग्रामीण भागातही वाढला आहे. प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवताना नागरिकांमध्ये असलेले गैरसमज अडथळा ठरत आहेत. त्यामुळे आता शहर व ग्रामीण स्तरावर अनुक्रमे प्रभाव व ग्रामस्तरीय समितीचे गठन करून जाणीव जागृती खबरदारी मोहीम आखण्यात आली आहे. उद्या, ५ मे रोजी या उपक्रमास सुरुवात होत आहे. २५ मेपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय करोना नियंत्रण समितीमार्फत आजारी, कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची माहिती घेणे, त्यांची प्राणवायूची पातळी तपासणे, लक्षणे असलेल्यांची चाचणी करून प्राप्त अहवालानुसार पुढील उपचाराच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांच्या मनात करोना संसर्ग, तपासणीबाबात असणारी भीती आणि लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होण्याची अपेक्षा प्रशासनास आहे. अहवाल सकारात्मक आल्यानंतर रुग्णांना कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालय येथे घेऊन जाण्याबाबतही नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. हे सर्व गैरसमज, संभ्रम दूर करून रुग्णांचे समुपदेशन या मोहिमेद्वारे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रुग्णांच्या मनातील चुकीच्या समजुती, गैरसमज दूर करण्यासाठी ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय समितीने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कार्य करावे व करोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या या कामी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर या मोहिमेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.