करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच खासगी रूग्णालयातील बेड्स आरक्षित ठेवण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागली आहे. तसेच, कोविड रूग्णालयातील डॉक्टरांवर पडणारा ताण लक्षात घेवून वर्धा जिल्ह्यातील काही डॉक्टरांनी सामान्य रूग्णालयात सेवा देण्याची तत्परता दर्शवली आहे.

दैनंदिन शेकडो करोनाबाधित रूग्णांचा उपचार सावंगी व सेवाग्रामच्या रूग्णालयात प्रामुख्याने होत आहे. पण या दोन्ही ठिकाणच्या आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण व वाढती रूग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील खासगी रूग्णालयातील काही बेड्स कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवण्याबाबत सूचना केल्या. आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयातील बेड्सची संख्या वाढवून खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याचेही सुचविण्यात आले.
गृह विलगीकरणात असलेले रूग्ण खासगी डॉक्टरांकडून औषधी व सल्ला घेतात. पण गरिब रूग्णांचा अशा डॉक्टरांशी संपर्क होत नसल्याने नगरपरिषदेने खासगी डॉक्टरांची यादी तयार करावी व त्यांच्या वेळा संल्ल्यासाठी निश्चित कराव्यात. रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्यानुसारच औषधी घ्यावी. जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पूलगावच्या शस्त्र भांडारमध्ये कोविड रूग्णालय सुरू केले आहे. त्यामुळे या घटकांनी कोविड रूग्णांना भरती करण्यासाठी पूलगाव सैनिक रूग्णालयाचा अधिकाधिक उपयोग करावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

राज्य शासनाने दिलेल्या नियमानूसार सायंकाळी सातपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहल्या. मात्र नागरिक त्यानिमित्याने नाहक घराबाहेर पडून गर्दी करत असल्याचे चित्र आहे. त्याची दखल घेत अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने सुरू राहण्याची वेळ दुपारी दोनपर्यत करण्यात आली. केवळ खानावळ व हॉटेल येथून पार्सल सेवा, दुध संकलन केंद्र, वैद्यकीय सेवा रात्री आठपर्यत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी चांगली असल्याने वर्धा जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात लस पूरवठा करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारने पाठविलेल्या करोना आढावा चमूने जिल्ह्यातील करोना सुविधाबाबत प्रशासनाचे कौतुक केल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. उपलब्ध साधन सामुग्रीचा योग्य वापर करून कोविड परिस्थिती योग्यरित्या हाताळत असल्याचा अभिप्राय दिल्याचे त्यांनी नमूद करीत अधिकाºयांचे अभिनंदन केले.

४० डॉक्टर सामान्य रूग्णालयात सेवा देण्यास तयार –
जिल्ह्यात सध्या साडेतीन हजारावर करोना रूग्ण असून त्यात दैनंदिन भर पडतच आहे. जिल्ह्यातील दोन वैद्यकीय महाविद्यालयासोबतच जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय मनुष्यबळावर ताण पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी खासगी डॉक्टरांनाही कोविड युध्दात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. तसेच या कार्यात स्वयंस्फुर्तीने नोंदणी करण्याची विनंती केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ४० डॉक्टर आजपासून सामान्य रूग्णालयात सेवा देण्यास तयार झाले आहे.
यामध्ये डॉक्टर सर्वश्री संयज मोगरे, नहूष घाटे, सचिन पावडे, ए.बी. जैन, विपीन राउत, अमित पूजारी, शंतनू चव्हाण, आर. रावेकर, अमरदीप टेंभरे, स्वप्नील तळवेकर, अभिजींत खांडे, सचिन अग्रवाल, प्रशील जुमडे, सारंग गोडे, अरूण पावडे, सचिन टोटे, सागर गौरकार, नितीन भलमे, सतिश हरणे, संदीप मोहले, सोनू वालिया, विक्रांत वनमाली, राजेंद्र डागा, विलास ढगे आदी डॉक्टरांचा समावेश आहे. चार डॉक्टरांचे चमू वेगवेगळ्या दिवशी सेवा देतील.