प्रशांत देशमुख

शिधापत्रिका नसणाऱ्यांना धान्य उपलब्ध करून देण्याचे काम शासनातर्फे युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र, मदतीपासून वंचित राहिलेल्या काहींना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धान्य व किराणा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास व आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडसंदर्भात आयोजित आढावा बैठक झाल्यानंतर तनपूरे यांनी लगतच्या शांतीनगर येथे भेट दिली. पक्षाचे स्थानिक नेते डॉ. संदीप देशमुख यांच्यासोबत त्यांनी गरजूंची विचारपूस केली. शिधापत्रिका नसणाऱ्या कुटुंबाला तात्पुरत्या स्वरूपात कूपन देण्यात येत आहे. या वस्तीतील अशा १७५ कुटुंबांना धान्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, काही लोकांनी यावेळी मदत होत नसल्याच्या तक्रारी केल्या. धान्य मिळत आहे, पण किराणा उपलब्ध झाला नसल्याचा त्यांचा सूर होता. मात्र, अशी तरतूद नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी पक्षातर्फे मदत देण्याचा विचार करू, असे नमूद केले.

ग्रामपंचायत सदस्यांना शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाची यादी तयार करण्याची सूचना त्यांनी दिली. येथील रामदास मडावी यांच्या कुटुंबाला त्यांनी धान्य व किराणा असलेली पिशवी भेट दिली. परिसरातील अन्य कुटुंबांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. पक्षातर्फे मदत करण्याबाबत काय ठरले, अशी विचारणा डॉ. संदीप देशमुख यांनी केल्यावर त्यांनी वरिष्ठ पातळीवर याविषयी निर्णय होणार असल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर मदतीबाबत अद्याप काही ठरले नसल्याचे देशमुख म्हणाले.