सेवाग्राम येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी होणाऱ्या संभाव्य वृक्ष तोडीला परिसरातील महिलांनीही विरोध दर्शविला आहे. तसेच, या झाडांचे रक्षण करण्याची महिलांनी प्रतिज्ञा करत ‘रक्षा सूत्र’ अभियान सुरू केले आहे.

रक्षाबंधन सणाच्या निमित्त बहीण-भावाच्या नात्याची जपणूक करणाऱ्या या भगिनींनी वृक्ष देखील आमची भावंडे आहेत, त्यांनाही दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करत सेवाग्राम मार्गावरील झाडांना रक्षा सूत्र बांधले. या आगळ्यावेगळ्या अभियानात सेवाग्राम, वरूड, धन्वंतरीनगर या भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या महिलांनी तोडणीसाठी खुणा केलेल्या वृक्षांना ओढणी, दुपट्टा, साड्यांचे काठ आणि सूतमाला बांधून वृक्षतोड थांबविण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

या मार्गावरील वृक्षांचे केवळ पर्यावरणीय महत्वच नसून आमचे भावनिक नातेही या झाडांशी जुळलेले आहे. चौपदरी रस्त्याची आम्हाला आज आणि भविष्यातही गरज नाही. हा रस्ता चौपदरी झाला नाही तर समाजाचे काहीच बिघडणार नाही, उलट चौपदरीकरण झाल्यास रस्त्यांवरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे आमच्या घरातील सदस्यांचा जीव धोक्यात येईल. यासाठीच आम्ही रक्षा सूत्र बांधून वृक्षतोडीला आणि अनावश्यक रस्ता रुंदीकरणाला विरोध करीत आहोत, अशी भावना भावना प्रिया कोंबे, मंजूषा देशमुख, भाग्यश्री उगले, निरंजना बंग, ज्योती पासवान, वैशाली आत्राम, प्रतिभा ठाकरे, डॉ. वर्मा, डॉ. गुप्ता, प्रिया जगताप, सावित्री नागोसे आदी भगिनींनी व्यक्त केली आहे.