News Flash

दुष्काळाच्या वणव्यात ‘जलजागृती’चा जागर!

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात गेल्या महिनाभरापासून जलजागृतीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

| March 8, 2015 01:55 am

दुष्काळाच्या वणव्यात गावोगावी पाण्याबाबत जाणीवजागृती होऊ लागली असून, पाणी मुरवण्यासाठी सरकारच्या सहभागाची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीने पुढे आले पाहिजे, याची खूणगाठ बांधून जनतेतून या कामी भरीव प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्ह्य़ात सध्या पाहावयास मिळत आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात गेल्या महिनाभरापासून जलजागृतीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यास औसा तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, तसेच शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी अनेक गावांनी मोठा लोकसहभाग दिला. मध्यरात्र उलटून एकपर्यंत लोकांचा उत्साह पाहून आपण स्तब्ध झाल्याची प्रतिक्रिया राणा यांनी व्यक्त केली.
राणा व खानापूरकर धुळवडीच्या दिवशी दिवसभर जिल्हय़ात होते. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्यासह अधिकारी सहभागी होते. एकाच दिवसात अनेक गावांत जायचे असल्यामुळे दोन पथके तयार करून लातूर, चाकूर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, निलंगा व औसा तालुक्यांतील गावांना त्यांनी भेटी दिल्या. माजी आमदार पाशा पटेल यांनी औसा तालुक्यातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी महिनाभरापासून गावोगावी जलजागृती सुरू केली. आतापर्यंत तालुक्यात सुमारे ७५ लाख रुपये लोकवाटय़ातून जमा झाले. राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी या तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी एक कोटी रुपये देऊ केले. जिल्हाधिकारी पोले यांनी ज्या गावात लोकसहभाग येईल, तेथे सिंचनाच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगून एक पट लोकसहभाग जमा झाल्यास सहा पट रकमेचे काम त्या गावात केले जाणार असल्याचे घोषित केले. तालुक्यातील बुधोडा ग्रामस्थांनी साडेसात लाख, एरंडी साडेपाच लाख, खुंटेगाव दोन लाख, उजनी साडेबारा लाख, मातोळा १२ लाख, किल्लारी साडेतीन लाख, खरोसा अडीच लाख, कार्ला ११ लाख अशी रक्कम उभी राहिली. बुधोडा येथील दलित समाजाच्या महिला बचतगटानेही आपला सहभाग देऊ केला. तब्बल २० महिला बचतगटांनी मिळून ८० हजार रुपये जलसिंचनाच्या कामासाठी लोकवाटा म्हणून दिला. बुधोडा व कार्ला या दोन गावांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता संपूर्ण लोकसहभागातून काम करण्याच्या जिद्दीने सुरुवात केली.
औसा येथील पाणी परिषदेसाठी रात्री ९ वाजता सुमारे १ हजार लोक उपस्थित होते, तर कार्ला येथे सिंचन कामाचा प्रारंभ मध्यरात्रीनंतर १ वाजता करण्यात आला. संपूर्ण गावच पाणी प्रश्नासाठी कामाला लागल्याचे पाहून राणाही भारावून गेले. ढोल, ताशे वाजवत राणा यांचे स्वागत करण्यात आले. तीन महिन्यांनंतर पुन्हा पाहणी करण्यास येणार असल्याचे राणा म्हणाले.
‘३० वर्षांचे नियोजन हवे’
गेल्या १०० वर्षांतील लातूरचा पावसाचा इतिहास पाहता सलग ३ वर्षांपेक्षा कधीही दुष्काळ पडला नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी किमान ३० वर्षांचे नियोजन करून जमिनीत पाणी मुरवण्याची योजना आखली पाहिजे. प्रत्येक गावात लोकांचा सहभाग घेऊन ही योजना अमलात आणल्यास दुष्काळ खात्रीशीर हटेल, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला.
जलयुक्त नव्हे जलमुक्तीची भीती
राज्य सरकारमार्फत जलयुक्त शिवार योजना अमलात आणण्याचा गाजावाजा केला जात असला, तरी ज्या पद्धतीने ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे ‘जलयुक्त’ऐवजी ती ‘जलमुक्त’ योजना होते की काय? अशी भीती खानापूरकर यांनी व्यक्त केली. लोकसहभाग घेऊनही सिंचन विभागाचे अधिकारी केवळ ३ फूट खोलच माती खोदण्याचे काम करीत असतील, तर या कामाचा कोणताही उपयोग नाही. किमान २० फूट खोल खोदल्याशिवाय पाणी अधिक मुरणार नाही. तीन वष्रे पाणीसाठा पुरेल इतके पाणी साठवले गेले पाहिजे. शिरपूर येथे असे काम आपण करून दाखवले. कोणत्याही शेतकऱ्याला ५०० मीटर अंतरावर किमान १० तास मोटार चालेल इतके पाणी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
भूजलतज्ज्ञांच्या देखरेखीखालीच काम
भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच सिंचनाचे लोकसहभागातून काम केले जाईल. नियमावर बोट ठेवून काम करण्यापेक्षा या कामामुळे लोकांना पाणी उपलब्ध व्हायला हवे, हे लक्षात घेऊनच जिल्हय़ात सिंचनाची कामे केली जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी पोले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 1:55 am

Web Title: water awareness try start
टॅग : Awareness
Next Stories
1 काँग्रेस नव्या प्रदेशाध्यक्षांचा ‘राष्ट्रवादी’समोर मैत्रीचा ‘हात’!
2 बीडमध्ये दोन महिन्यांनंतरही शेतकऱ्यांचे अनुदान रखडले
3 अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे नाममात्रच ठरणार
Just Now!
X