जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट यांच्या वतीने जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत २६ एप्रिल रोजी येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रोहिदास पाटील हे राहणार असून डॉ. सिंह हे जवाहर ट्रस्टने धुळे तालुक्यात केलेल्या सिंचनाच्या कामांसह अक्कलपाडा प्रकल्पालाही भेट देणार आहेत.

जिल्ह्य़ातील गावागावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनाने दुष्काळ तीव्र झाला आहे. यामुळे पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरण्यासाठी आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करता येऊ शकणाऱ्या सर्व उपायांची शक्यता यावर सूक्ष्म विचार करण्याची गरज लक्षात घेऊन आ. कुणाल पाटील यांनी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीने पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता देवपूरमध्ये बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात पाणी परिषद होईल. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हादिकारी अण्णासाहेब मिसाळ, बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे उपस्थित राहणार आहेत. सकाळी आठ वाजता अक्कलपाडा प्रकल्पाची पाहणी करून पांझरा नदीवरील नेर, कुसुंबाजवळील फड पद्धतीच्या बंधाऱ्याची तसेच तालुक्यात ट्रस्टमार्फत कावठी येथे सुरू असलेल्या नाला, बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरण केलेल्या सिंचन कामांची डॉ. राजेंद्र सिंह पहाणी करणार आहेत. ट्रस्टच्या वतीने एकूण ४२ गावांतील २०८ ठिकाणी नाला व बंधारा खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे झाली आहेत. पाणी परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्या वतीने आ. कुणाल पाटील यांनी केले आहे.