कडक उन्हामुळे पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज भासत आहे. त्यात आता रानातील पाणवठे कोरडे पडू लागल्याने त्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे विविध पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची उणीव भासत असल्याने मोताळ्याच्या फ्रेंडस् माय लाईफ ग्रुपने यंदाही मोताळा परिसरात १०० जलकुंडय़ांची व्यवस्था केली आहे. शहरातील पत्रकार व फ्रेंडस् माय लाईफ या ग्रुपने गेल्या चार वर्षांंपासून हा उपक्रम सुरू केला आहे. यंदाही पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी जलकुंडय़ा लावण्यात आल्या आहेत.
पंचायत समिती कार्यालय, तहसील, पोलिस ठाणे, बुलढाणा अर्बन बॅंक, मोताळा-नांदुरा रोड, स्वस्तिक किराणा, श्री. शिवाजी महाविद्यालय, पुष्पा टाईपरायटिंग, गणेश ऑफसेट, धन्वंतरी हॉस्पिटल, धुनके कॉम्प्लेक्स, स्टेट बंॅक, जैस्वाल हार्डवेअर, नारायण इलेक्ट्रिकल्स, सामाजिक वनिकरण कार्यालय, डॉ. फेगडे क्लिनिक, पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत. विविध कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, डॉक्टर्स व समाजसेवकांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे.