भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने पाणीपातळी मोजण्यासाठी निश्चित केलेल्या पाणलोट क्षेत्रातील विहिरीत मागील पाच वर्षांच्या तुलनेत मार्चअखेर तब्बल एक मीटरने घट झाल्याचे नोंदवले गेले. सलग तीन वर्षांपासून सरासरीच्या निम्माच पडणारा पाऊस, तसेच पावसाचे पडलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठीच्या उपाययोजना नसल्यामुळे पाणीपातळी दिवसेंदिवस खोल होत आहे. उसाच्या पिकासाठी होणारा उपसा लक्षात घेता मेअखेर पाणीपातळीत आणखी घट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून पर्जन्यमान मोठय़ा प्रमाणात घटले. सरासरीच्या निम्माच पाऊस पडत असल्याची नोंद होत असून, यंदाही ऑक्टोबरअखेर ५६ टक्केच पाऊस झाला. पडलेल्या पावसाच्या पाण्याची जमिनीत मुरण्याची फारशी प्रक्रिया नसल्यामुळे पडलेले पाणीही नदीनाल्यातून वाहून जाते. परिणामी, पावसाळय़ातही पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ जनतेवर आली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टंचाईच्या झळा जास्तच तीव्र होतात. १९७२पासून भूजल सर्वेक्षण विभागाने १२६ विहिरी पाणीपातळी मोजण्यासाठी आरक्षित केल्या. यात अंबाजोगाई १२, आष्टी २३, बीड १७, धारूर ३, गेवराई १७, केज ३, माजलगाव १६, परळी १०, पाटोदा ९, शिरूर १०, वडवणी ६ असा समावेश आहे. या विहिरींतून दर ३ महिन्यांनी भूजल पातळीचे मोजमाप केले जाते.
शेवटच्या ५ वर्षांत मार्चअखेर सरासरी पाणीपातळी ८.३९ मीटर होती, तर मार्चअखेर पाणीपातळी ९.३३ मीटर खोल गेली. पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी पाणीपातळीची खोली एक मीटरने घटली. गेल्या ३ वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाणीपातळी खोल जाऊ लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी पाणीपातळी ७.७५ मीटर होती. सध्या यात १.५८ मीटरने घट झाली. पर्जन्यमानात होणारी घट ही भूजल पातळी खालावण्यास कारणीभूत ठरली आहे. मार्चअखेर झालेल्या भूजल सर्वेक्षणात खालावलेली पाणीपातळी एप्रिल-मेमध्ये आणखी खोल जाण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये पुन्हा सर्वेक्षण- मेश्राम
भूजल पातळीत एक मीटरने घट झाली आहे. यापुढे दोन महिन्यांच्या कालावधीत विहिरी, नदी-नाले, तलाव कोरडे पडतात. त्यामुळे पाणीपातळी आणखी खोल जाते. पर्जन्यमानात सातत्याने घट होत असल्याने भूजल पातळीवर याचा परिणाम होतो. जूनमध्ये पुन्हा भूजल सर्वेक्षण करून पावसाळय़ापूर्वीची पाणीपातळी निश्चित केली जाते, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक भीमराव मेश्राम यांनी दिली.