निरवडे बाईतवाडी येथील जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग लघु पाटबंधारे विभागाने पैसे खर्च घालूनही बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले नाही. मात्र यंत्रणेने काम प्रगतिपथावर असल्याचे कागदोपत्री दाखवून वरिष्ठांची दिशाभूल केल्याची टीका होत आहे.
जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत निरवडे बाईतवाडी येथील बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या ठिकाणी मूळचा बंधाऱ्याचा सांगाडा अस्तित्वात आहे. या बंधाऱ्याची अंदाजपत्रकीय किंमत सात लाख ९१ हजार ७०४ रुपये असून निविदा रक्कम सात लाख ३१ हजार ९०१ रुपये आहे.
या बंधाऱ्याचा कार्यारंभ ३ जून रोजी करण्यात आला असून, ३१ डिसेंबपर्यंत काम करण्याची मुदत आहे. बंधाऱ्याचे मातीकाम ४२९ घनमीटर आहे. बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १२४.७० सहस्र घनमीटर असून जोखीम कालावधी दोन वर्षांची मुदत आहे.
या जलयुक्त शिवार बंधाऱ्याचे काम जुन्या बंधाऱ्यावर करण्यात येणार आहे. या ठिकाणी जुना बंधारा आहे तो फळ्या टाकून पाणी अडविणारा आहे. सध्या या बंधाऱ्यात पाणी नाही. आता पुढील पावसाळ्याशिवाय बंधाऱ्यात पाणी साठवणूक होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या जलयुक्त शिवार बंधाऱ्याचे काम गेले पाच महिने झालेले नाही. आता एकच महिना बाकी असून ठेकेदार घिसाडघाईने काम करण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वाळू व खडी टाकण्यात आली असली तरी जलयुक्त शिवार योजनेचे तसूभरही काम झाले नाही. या योजनेत काही आर्थिक रक्कम खर्ची पडल्याचे सांगण्यात आले.