जिल्ह्यातील बार्शिटाकळीत पाण्याची चोरी होत असताना प्रशासन मात्र धिम्म आहे. पाणी हे जीवन आहे व याचा एकेक थेंब वाचवण्याचा प्रयत्न करावयास हवा, अशा सूचना गेल्या काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जलयुक्त शिवार मोहिमेच्या प्रसंगी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, पण या सूचना पालथ्या घडय़ावर पाण्यासारखे झाल्याचे बार्शिटाकळी पाणी चोरी प्रकरणात दिसून येत आहे. महानवरून अकोल्यास पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बार्शिटाकळी गावातून जाते, जलवाहिनी फ ोडून मोठय़ा प्रमाणावर जल वाया घालवले जाते वा चोरले जाते. याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रशासन अजूनही पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यास तयार नाही.

येथील समाजकंटकांनी जलवाहिनीवरील फोडलेला व्हॉल्व दुरुस्त करण्यासाठी महापालिकेचा कंत्राटदार गेला असता त्यास तेथील काही लोकांनी प्रथम शिवीगाळ व मारहाण केली आणि त्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. परिणामी त्यास काम करणे बंद करावे लागले. महापालिका प्रशासनाने ही बाब जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिसांच्या कानावर घातली आहे. पण या दोन्ही यंत्रणांनी त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. बार्शिटाकळीची समस्या कशी मिटवावी व पाण्याचा अपव्यय व चोरी कशी थांबवावी, हा प्रशासनासमोरील प्रश्न आहे.