नदीतील पाणीपातळी कमी झाल्याने लातूरसाठी धाडण्यात येणारी जलदूत दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. जॅकवेलच्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी वारणा धरणातून शनिवारपासून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून लातूरला मंगळवारपासून पाणीपुरवठा नित्याप्रमाणे होणार आहे.
जलसंपदा विभागाचे नियोजन फसल्याने लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रेल्वेच्या नदीतील जॅकवेलजवळ पाणीपातळी कमालीची घटली. यामुळे रेल्वेचे टँकर भरण्यास विलंब झाल्याने आज आणि उद्या जलदूत पाठविण्यास स्थगित करण्यात आले आहे. पाणीसाठा योग्य राहावा यासाठी वारणा धरणातून शनिवारपासून प्रतिसेकंद १ हजार ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उद्यापर्यंत जॅकवेलला येऊन पोहोचेल, असा जलसंपदा विभागाचा अंदाज असून त्यानंतर पाणीउपसा सुरळीत होईल आणि मंगळवापर्यंत जलदूत लातूरला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.