|| अनिकेत साठे

ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत

परतण्यापूर्वीच पावसाने दडी मारली. हिरवाईने नटलेला परिसर भकास होऊ लागला आहे. उजाड होणारी माळराने घोंघावणाऱ्या संकटाची चाहूल देत आहेत. खरीप हंगामात उत्पन्नाची खात्री असते. त्यावर दसरा-दिवाळीपासून ते लग्नकार्य, शिक्षण, औषधोपचारापर्यंतचे खर्च अवलंबून असतात. पण पावसाने पाठ फिरवली अन् कित्येकांची खर्चाची समीकरणे तर बिघडलीच शिवाय स्वप्नेही उद्ध्वस्त झाली.

उत्तर महाराष्ट्रात खरिपातील काही पिके हातची गेली. जिथे त्यांनी तग धरली, तिथे उत्पादनात कमालीची घट होण्याची भीती आहे. अखेरच्या टप्प्यातील पावसावर रब्बी हंगाम अवलंबून होता. परंतु पावसाने दडी मारल्याने ती आशा मावळली आहे. एरवी उन्हाळ्यात बसणारे पाणी टंचाईचे चटके यंदा ऑक्टोबरच्या प्रारंभीच बसू लागले आहेत. आधीच मंदावलेली ग्रामीण अर्थव्यवस्था दुष्काळाने उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काही भागावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. परतीच्या पावसाकडे शेतकरी आशेने पाहत होते. तोच रुसल्याने संकटे उभी ठाकली आहेत. दिवसागणिक ती वाढत जातील. त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग दृष्टिपथात नाही.

या हंगामात पावसाने काही भागावर कृपा केली, तर काही भाग त्याने कोरडा ठेवला. यंदा पाऊस उशिरा आला. सुरुवातीला त्याने काही तालुक्यांत दमदार हजेरी लावली, तर काही भागातील भुईला त्याने जेमतेम भिजवले. नंतर सर्वत्र बरसला मात्र, अनुशेष भरून निघाला नाही.

वार्षिक सरासरीनुसार नाशिक जिल्ह्य़ात सरासरी १०७५.७७ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा तो ८८९.२९ अर्थात ८२.६ टक्के झाला. धुळे जिल्ह्य़ात सरासरी ४०३.५ मिलीमीटर (७१.३ टक्के), जळगावमध्ये ४४६.४ (६३.६ टक्के), नंदुरबारमध्ये ५६३.२ मिलीमीटर (६४.२ टक्के) इतका पाऊस पडला. कमी पावसामुळे खरिपाची सर्वच पिके करपली आहेत.

नाशिकमध्ये भात, कांदा, डाळिंब ही प्रमुख पिके. भाताला खूप पाणी लागते. पावसात खंड पडल्याने त्याचे उत्पादन २० टक्क्यांनी घटणार आहे. दुष्काळी भागात मूग, उडीद, भुईमूग, मका, बाजरीचे उत्पादन १५ ते ३० टक्क्यांनी कमी होणार आहे. जळगावमध्ये यंदा सुमारे सात लाख हेक्टरवर खरीप हंगामाचा पेरा झाला होता. त्यात साडेचार लाख हेक्टरवरील कापसाचा अंतर्भाव आहे. पावसात ५० दिवसांपेक्षा अधिक खंड पडला. पाण्याअभावी उत्पादनात ३५ टक्के घट होईल, असा अंदाज आहे. मूग, उडीद, कोरडवाहू कापूस पिके गेल्यात जमा आहेत. सोयाबीन, कोरडवाहू कापसाला पाते लागत असताना पावसाने निरोप घेतला आहे.

पिकांनी मान टाकली

धुळे, नंदुरबारच्या काही भागांत पावसाच्या हुलकावणीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली. नाशिक, धुळ्यात पावसाच्या भरवशावर कांद्याची लागवड करण्यात आली. महागडी खते, बियाणी वापरली. पाऊस गायब झाल्याने कांद्याबरोबर सोयाबीन, मका, इत्यादी पिके डोळ्यासमोर मान टाकू लागली आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कापसाची फुलझड होत आहे. मालेगाव, सटाणा परिसरात डाळिंबाच्या बागांना देण्यासाठी पाणीच शिल्लक नाही. पावसाळ्यात अनेकांनी कोबी लागवड केली होती. कोबीला मातीमोल भाव मिळाल्याने शेतात गुरे सोडावी लागली. रब्बी हंगामात अनेक ठिकाणी पेरणी करता येणार नाही, अशी स्थिती आहे.

१८ दिवसांत एकदाच तासभर पाणी

या संकटाचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. पोळा निरुत्साहात झाला. दसरा, दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठेत शांतता आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होते. जे काही भांडवल होते ते खरिपात गेले. हाती काही लागणार नसल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण जात असल्याचे शेतकरी सांगतात. दुष्काळाची झळ निमशहरी आणि शहरी भागांना बसत आहे. सव्वा लाख लोकसंख्येच्या मनमाड शहरात १८ दिवसांतून एकदाच अवघ्या तासाभरासाठी पाणीपुरवठा होतो. नांदगाव शहरात हे प्रमाण १५ दिवसाआड आहे. जळगावमधील पारोळा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर तालुक्यात बिकट परिस्थिती आहे. या शहरांत सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कोणत्याही घरात प्रवेश केला तरी ५०० किंवा हजार लिटर पाण्याच्या टाक्या दृष्टीस पडतात. पाणी साठवून ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही.

कूपनलिका, विहिरीही आटल्या

पुरेशा पाण्याअभावी आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. इतरवेळी कूपनलिकांचा आधार असतो. जमिनीच्या पोटातले पाणी आटल्याने कूपनलिकांत तरी पाणी येणार कोठून, असा प्रश्न आहे. भूगर्भातील पाण्याचा तळ ३०० फुटापर्यंत खाली गेल्याने ७५ टक्के कूपनलिका कोरडय़ा पडल्या आहेत. विहिरीही खपाटीला गेल्या आहेत. दुष्काळी भागातील धरणांमध्ये जे काही पाणी शिल्लक आहे, ते शेतीला वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

पाणीसंघर्ष तीव्र 

धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला, देवळा, बागलाण तालुक्यात २३९ गाव-वाडय़ांना ५३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जळगावमध्ये १७ गावांना १३ टँकर, धुळ्यात आठ गावांना सात टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाटय़ाने वाढणार आहे. नंदुरबारमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अलीकडेच दंगल उसळली होती. विहीर बुजविण्याची नोटीस पाटबंधारे विभागाने दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी रिसॉर्टची तोडफोड, जाळपोळ केली. पोलिसांना सौम्य लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. पाण्यासाठी होणारे संघर्ष वाढण्याची भीती आहे.

यंदा जलसाठा कमी

नाशिक जिल्ह्य़ातील मोठय़ा, मध्यम जलप्रकल्पात सध्या ५१ हजार १०५ दशलक्ष घनफूट (७८ टक्के) जलसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ८९ टक्के होते. जळगावमधील ११२ मोठय़ा-मध्यम-लघू प्रकल्पांत २७ हजार ६४७ दशलक्ष घनफूट (५४ टक्के), धुळे जिल्ह्य़ातील ५८ प्रकल्पांमध्ये १० हजार २०४ दशलक्ष घनफूट (६० टक्के), नंदुरबारमधील ४१ प्रकल्पांत ५०४९.३३ दशलक्ष घनफूट (७३ टक्के) जलसाठा आहे.