लातूरच्या पाणीपुरवठय़ास दहा तास विलंब
जलसंपदा विभागाचे नियोजन कोलमडल्याने मिरजेतून लातूरला रेल्वेने केला जाणारा पाणी पुरवठा तब्बल दहा तास विलंबाने होत असून, ऐन टंचाईच्या काळात म्हैसाळ योजना बंद पडली आहे. वारणा धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने सोडण्यात येणारे पाणी कमी असल्याने म्हैसाळ योजनेचे पंप गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत.
कर्नाटकसाठी कोयना व वारणा धरणांतून २ टीएमसी पाणी सोडण्यात आले त्यावेळी म्हैसाळ येथील कृष्णा नदीवर असलेल्या धरणाच्या फळ्या काढण्यात आल्या. मात्र, कर्नाटकसाठी सोडण्यात येत असलेले पाणी बंद केल्यानंतर म्हैसाळ पंप गृहाशेजारी असलेला जलसाठाही मोकळा झाला. तेथे पाणी साठविले गेलेच नाही. यामुळे म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद करण्यात आले आहेत. म्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्यांना सध्या पाणी पुरवठा करण्यात येतो. योजनेचे पंप बंद ठेवण्यात आल्याने योजनेतील पाणी पुरवठा ठप्प झाला असून, याचा परिणाम शेतीबरोबरच जनावरांसाठीच्या व पिण्याच्या पाणी पुरवठय़ावर झाला आहे. म्हैसाळ धरणात गुरूवारपासून केवळ ६ फूट पाणी पातळी आहे.
लातूरसाठी ११ एप्रिलपासून पाणी पुरवठा केला जात असून, रेल्वेच्या पंपहाउसवरही पाणी पातळी कमी झाल्याने अपुरा पाणी उपसा होत आहे. यामुळे हैदरखान विहिरीत येणारी पाण्याची आवक आणि रेल्वे टँकरमध्ये भरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये तफावत असल्याने टँकर भरण्यास विलंब लागत आहे. शुक्रवारी ५० टँकर मध्यरात्री भरण्यात आले. यामुळे शुक्रवारी सायंकाळी रवाना होणारी जलदूत एक्सप्रेस तब्बल १० तास विलंबाने शनिवारी सकाळी साडेसात वाजता लातूरसाठी रवाना करण्यात आली. लातूरच्या जलदूतसाठी पाणी पुरवठा यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. मात्र, जलसंपदा विभाग, जीवन प्राधिकरण व रेल्वे यांच्यात समन्वय साधण्यात अडचणी येत असल्याने पाणीपुरवठय़ास विलंब होत असल्याचे समजते.

नियोजन चुकल्याने त्रेधा
वारणा धरणाला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे वारणा धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग २२०० क्युसेक्सवरून निम्म्यावर म्हणजे १२०० क्युसेक्स करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून नदीतील पाणी पातळी कमी झाली असली तरी कर्नाटकला सोडण्यात येणाऱ्या पाण्यावेळी खुली करण्यात आलेली म्हैसाळ धरणाची दारे बंद करण्याचे नियोजन चुकल्याने ऐन टंचाईच्या काळात त्रेधा उडाली आहे.