15 November 2019

News Flash

आम्ही सर्व ४८ जागा जिंकू शकतो – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू शकते असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे

(संग्रहित छायाचित्र)

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू शकते असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी एक्झिट पोलवर भाष्य करणं टाळलं. ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते त्यांनी दिले आहेत. ते आकडे खरे की खोटे निकालानंतर स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं आहे. २३ तारखेपर्यंत सर्वांनी थांबलं पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. याआधी अकोल्यात बोलताना मतदानोत्तर चाचणीमध्ये काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असल्याचा दावा वंचित प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

२०१४ हा काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा उच्चांक होता याबद्दल दुमत नाही. सामान्य माणसांमध्ये काँग्रेसबद्दल चीड होती. त्यामुळेच भाजपाने ४२ जागा जिंकल्या असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी ईव्हीएम हॅक केले जात असल्याच्या विरोधकांच्या दाव्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ईव्हीएम हॅकिंगची शक्यता नाकारता येत नाही.

‘ईव्हीएम हॅकिंग करणं कठीण नाही. कोणतंही इलेक्ट्रॉनिक आयटम हॅक होऊ शकतं. हॅक कसं होतं हे फक्त शिकलं पाहिजे. असं कोणतंही यंत्र नाही जे हँकिग होऊ शकत नाही’, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. निवडणुकीत पराभव झाल्यास कोणाला जबाबदार ठरवलं जाईल असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही कोणा एकावर खापर फोडणार नाही. आत्मपरिक्षण करुन लोकांसमोर मांडू’.

विजय आपलाच – आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमातून कार्यकर्त्यांना धीर देणारा संदेश दिला आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचे दाखवण्यात येत आहे. शिवाय स्वत: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अकोला व सोलापूरमधून विजयी होऊ शकणार नाही, असा अंदाज मतदानोत्तर चाचणीत वर्तवण्यात आला. या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर संदेशात म्हणतात की, ‘मतदानोत्तर चाचणीमध्ये निकाल काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असेल. अकोला आणि सोलापुरात उमेदवार म्हणून फार वेळ देऊ शकलो नाही. तरीही कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जिद्दीने लढत दिली.’

First Published on May 22, 2019 1:10 pm

Web Title: we can win all 48 seats says prakash ambedkar