आपण शिवसेनेत आहोत व यापुढेही राहणार असे सांगून आमदार अशोक काळे यांनी पक्षांतराच्या चर्चेचे स्पष्ट शब्दांत खंडन केले. माझ्या राजकीय यशामुळे जळफळाट झालेल्यांनी ही अफवा पसरवली आहे, असा आरोपही त्यांनी केला. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर होणार आहे, त्यामुळे आपल्या पक्षांतराचा प्रश्नच निर्माण होत नाही असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
आमदार काळे म्हणाले, कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित केले आणि मुलाच्या विवाहाला उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित राहिल्याचा राजकीय अर्थ काढून मी आता पक्षांतर करणार असल्याच्या वावडय़ा जिल्हय़ात उठवल्या जात आहेत. मात्र, मी शिवसेनेतच आहे आणि राहणार. माझ्यावर वडिलांचे संस्कार आहेत. दिलेला शब्द पाळण्याची आमची संस्कृती आहे. शिवसेनेने माझ्या गळय़ात आमदारकीची माळ टाकली, त्यांचा विश्वासघात माझ्याकडून होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार असल्याने पक्षांतर करून बुडत्या जहाजात कशाला बसू, असा सवाल त्यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आमदारकीची संधी दिली. त्यामुळेच मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. असे असताना निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा विश्वासघात करायला भाऊसाहेब वाकचौरे नाही. साईबाबांच्या खोटय़ा शपथा खाऊन वाकचौरेंनी गद्दारी केली, तसे आमच्या रक्तात नाही. जुलै महिन्यात मुलाच्या लग्नाला राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित राहिले. कर्मवीरांच्या स्मृती उद्यानाच्या उद्घाटनाला ज्येष्ठ नेते शरद पवार आले म्हणून मी राष्ट्रवादीत जाणार असे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे. पवारांशी माझ्या कुटुंबाचे अर्धशतकापेक्षा अधिक काळ संबंध आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमच्या नेहमीच गाठीभेटी होतात. त्याचा संबंध राजकारणाशी जोडणे योग्य नाही. वैयक्तिक माझे सर्वपक्षीयांमध्ये मत्रिपूर्ण संबंध आहेत. आता तर व्याहीसुद्धा राष्ट्रवादीचे आहेत. स्वत: शरद पवारांचेही शिवसेनाप्रमुखांशी दृढ कौटुंबिक संबंध होते. त्यात कधी राजकारण आले नाही. राजकारणापलीकडे जाऊन वैयक्तिक संबंध असू शकतात असे काळे म्हणाले.
मतदारसंघातील पाणीप्रश्न सुटत नाही म्हणून काहींना पक्षांतर करावेसे वाटते, असा खोचक उल्लेख करून काळे म्हणाले, आमदार होण्यासाठी तालुक्यात अनेकांनी गुडघ्याला बािशग बांधले आहे. त्यातील निदान वयाचे, आपल्या कर्तृत्वाचे भान राखणे गरजेचे आहे. पक्षातील दुकानदारी संपत आल्यामुळे अशा मंडळींना पक्षांतराबाबत विधाने करावी लागत असतील असे ते म्हणाले.