करोनाकाळात वसई-विरारमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : वसई-विरारमध्ये पुन्हा पाणी माफिया मोठय़ा जोमाने सक्रिय होत आहेत. स्थानिक प्रशासन करोनावर नियंत्रण मिळविण्यात व्यस्त असल्याने पाणी माफियांनी पुन्हा आपली दुकाने थाटली आहेत. हे पाणी माफिया चक्क शुद्ध पाण्याच्या (मिनरल वॉटर) नावाखाली विहिरीतील पाणी बाटलीबंद करून लोकांना विकत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई-विरारमध्ये एकीकडे कोविड- १९ चे थैमान सुरू असताना आता त्याचबरोबर नागरिकांना इतर आजारांचासुद्धा सामना करवा लागत आहे. कारण बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली पाणी माफिया विहरी, बोअरवेलचे पाणी सीलबंद करून सरळ लोकांच्या घरी विकत आहेत. वसई-विरार महानगरपालिका कोविड-१९ महासाथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहेत. यामुळे सर्वच आस्थपनांतील कर्मचारी हे व्यस्त असल्याचा फायदा घेत वसई-विरारमध्ये पुन्हा शुद्ध पाण्याचे प्रकल्प उभे राहू लागले आहेत. यात पाणी माफिया पाण्यावर कुठल्याही प्रक्रिया न करता सरळ विहिरीतील आणि बोअरिंगमधील पाणी बाटलीत भरून सीलबंद करून विकत आहेत. यामुळे नागरिकांना करोनाबरोबर इतर आजारांचा सामना करावा लागत आहे.

वसई-विरार मनपा प्रभाग (एफ ) कार्यालय  पेल्हार परिसरात मिनरल वॉटरचे मोठय़ा प्रमाणात प्लान्ट उभारले जात आहेत.  याबाबत माहिती देताना स्थानिक रहिवासी संजय माने यांनी माहिती दिली की, याबाबत आम्ही अनेक वेळा पालिकेला तक्रार केली आहे. पण पालिका कोणतीही कारवाई करत नाही.

मनपा आरोग्य विभाग अधिकारी आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नसल्याचे सांगत कानाडोळा करत आहेत. यामुळे पालिकेच्या निष्क्रिय धोरणामुळे खुलेआम पाणी माफिया विहिरी आणि बोअरिंगचे पाणी मिनरल वॉटर म्हणून विकत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आमच्याकडे या प्रकरणी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. अशा प्रकारची कोणती तक्रार आल्यास आम्ही कारवाई करू.

– मनोहर केदारे, आरोग्य अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका