पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि नरेंद्र मोदींची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचे जोरदार प्रयत्न करत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्वांना धक्का देणार विधान केलं आहे. तिसरी आघाडी हा व्यवहार्य पर्याय नसून तो यशस्वी होणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं.

शरद पवार हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राजकारणात त्यांनी बरेच चढ-उतार अनुभवले आहेत. त्यामुळे त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करता येणार नाही. माझ्या अनेक सहकाऱ्यांना महाआघाडी झाली पाहिजे असे वाटते पण अशी आघाडी अस्तित्वात येणार नाही असे शरद पवार म्हणाले. काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव पुढे केले जात आहे. पण पवारांनी पंतप्रधानपदासाठी कोणा एका व्यक्तीचे नाव घेण्यास नकार दिला.

१९७७ साली निवडणुकीनंतर विजयी पक्षांमधून पंतप्रधानपदासाठी मोरारजी देसाई यांचे नाव पुढे आले होते तसेच आताही घडू शकते असे पवार म्हणाले. तिसऱ्या आघाडीबद्दल मला स्वत:ला खात्री वाटत नाही. मला १९७७ सारखी स्थिती वाटत आहे असे पवार म्हणाले. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी देशातील भक्कम नेत्या होत्या. आणीबाणी लागू झाल्यानंतर कुठलाही पक्ष नव्हता पण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लोकांनी आणीबाणीविरोधात मतपेटीतून आपला राग व्यक्त केला. त्यांनी काँग्रेसचा आणि इंदिरा गांधींचा पराभव केला.

त्यावेळी ज्या पक्षांनी इंदिरा गांधींचा पराभव केला त्यांनी पुढे एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर मोरारजी देसाई यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले पण निवडणुकीच्याकाळात कोणीही पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांचे नाव घेत नव्हते अशी आठवण पवारांनी यावेळी सांगितली.