‘विधानसभेवर भगवा कधी फडकणार,’ असा अनाहूत प्रश्न स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात विचारला गेला. परंतु हा प्रश्नच हे केंद्र बंद पडण्यास कारणीभूत ठरला!
जिल्हा प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालविण्यात येत आहे. यात  विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. गेल्या ५ डिसेंबरला लातूरचे सहायक जिल्हाधिकारी सुशील खोडवे यांनी या वर्गात मार्गदर्शन केले. या वेळी प्रश्नोत्तरादरम्यान एका श्रोत्याने वरील प्रश्न विचारला. परंतु तोच हा मार्गदर्शन वर्ग बंद करण्यास कारणीभूत
ठरला.
नांदेड जिल्हा प्रशासनाने मागील काही वर्षांत शासकीय योजनांसोबत काहा लोकाभिमुख उपक्रम सुरू केले. जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मौलिक मार्गदर्शन मिळावे, या हेतूने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मार्गदर्शन वर्ग भरविण्याचा उपक्रम माजी जिल्हाधिकारी परदेशी यांनी सुरू केला. त्यांच्या बदलीनंतरही हा उपक्रम सुरू होता. परदेशींच्या काळात वर्गामध्ये अत्यंत शिस्त असे. परंतु मागील काही महिन्यांत या वर्गात खोडकर मुलांचाही कळत नकळत शिरकाव झाला.
दि. ५ डिसेंबरच्या मार्गदर्शन वर्गाला लातूरचे सहायक जिल्हाधिकारी सुशील खोडवे आले होते. त्याआधी भोकरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांना विद्यार्थ्यांनी हैराण करून सोडले. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यासाठी ते उभे राहिले असता ‘पुरे, पुरे, बसा, बसा’ म्हणण्यापर्यंत काही उपस्थितांनी मजल गाठली. नंतर खोडवे बोलायला उभे राहिले. विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन ऐकले. पण प्रश्न विचारते वेळी एकाने ‘विधानसभेवर भगवा कधी फडकणार?’ असा चमत्कारिक प्रश्न विचारला. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना ही बाब खटकली आणि त्यांनी या वर्गाचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.
दि. ५ डिसेंबरला भरलेला वर्ग शेवटचा ठरला. नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यात मार्गदर्शन वर्गाची व वक्त्याच्या नावाची घोषणा झाली नाही. तसेच फेब्रुवारीतही या तारखेला वर्ग झाला नाही. या बाबत चौकशी केली असता मागील काही महिन्यांपासून शिस्त बिघडल्याने व उपक्रमाचे गांभीर्य हरपल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम थांबविला असल्याचे सांगण्यात आले. असे असले, तरी अनेक होतकरू व स्पर्धा परीक्षांचा गंभीरपणे अभ्यास करणारे विद्यार्थी या वर्गाबद्दल चौकशी करू लागले आहेत.
प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्गात आधी यू.पी.एस.सी. किंवा एम.पी.एस.सी परीक्षांची पूर्वतयारी करणारे विद्यार्थीच येत. पण पुढे पोलीस भरती, डी.एड. प्रवेश आदी दुय्यम परीक्षांची तयारी करणारे, न करणारेही यायला लागले. त्यावर कोणाचेच, कोणतेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे सभागृह खचाखच भरे. पण डी.एड. भरती कधी? पोलीस पाटील भरतीचे काय? असे फुटकळ प्रश्न विचारले जाऊ लागले.