मोहन अटाळकर

गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना मेळघाटातील अशिक्षित आदिवासी अंधश्रद्धेला बळी पडताहेत. नुकताच मेळघाटातील बोरदा या गावात श्याम सज्जू तोटा या ८ महिन्याच्या बालकाला पोटफुगी आजारावरून पोटाला गरम सळईचे चटके देण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर लगेच बारुगव्हाण गावात निकिता दिलीप चिमोटे या २ वर्षीय बालिकेलाही चटके देण्याचे प्रकरण उघडकीस आले. मेळघाटातील अंधश्रद्धा कुपोषणाच्या वाढीसही कारणीभूत मानली जाते. ती घालविण्यासाठी कायदेशीर कारवाईसोबतच समुपदेशनाचीही गरज व्यक्त होऊ लागली आहे.

पोटावर चटके दिलेल्या या दोन बालकांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाच महिन्यात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. मेळघाटातील बोरदा आणि बारुगव्हाण ही गावे अतिदुर्गम आहेत. या गावात बससुद्धा जात नाही. पावसाळ्यात लहान बालकांचे पोट दुखायला लागले की गावातील मांत्रिक म्हणजेच भगत किंवा घरातील मोठी व्यक्ती पोटावर गरम विळ्याने किंवा सळईने चटके देतात.

आठ महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात न नेता भगत भूमकाकडे नेले. भगताने सांगितल्याप्रमाणे पालकांनी मुलाच्या पोटावर चटके दिले. हा प्रकार कळताच काटकुंभ येथील भरारी पथकाने तत्काळ त्या चिमुकल्याच्या उपचारार्थ चुरणी येथे दाखल करून उपचार सुरू केले. दरम्यान, चिखलदरा पोलिसांकडून बालकावर उपचार करणारी दाई व बालकाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.

श्याम सज्जू तोटा व निकिता दिलीप चिमोटे या दोन बालकांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दोन्ही बालकांना भेटण्यासाठी  महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिले.

अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांचा मिळून मेळघाट विभाग बनला आहे. सातपुडा पर्वताच्या सात रांगा या भागात एकत्र येत असल्याने याला मेळघाट म्हटले जाते. या दोन तालुक्याची लोकसंख्या तीन लाख असून याच भागात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.

मेळघाट दुर्गम डोंगरी भाग असून येथील ९० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. यातही कोरकू जमात ७५ टक्के आहे.  बहुतेक आदिवासी शेतमजूर किंवा अल्पभूधारक आहेत. उत्पन्नाची साधने कमी असल्याने गरिबीचे प्रमाण अधिक आहे. म्हणून बहुतांश लोक पावसाळ्यानंतर कामासाठी मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या इतर भागांत जातात.

समुपदेशन गरजेचे

आदिवासी मोठय़ा प्रमाणात भगत, परिहार यांच्याकडे आजारावरील उपचारासाठी जातात. त्यामुळे बाळावर वेळेत उपचार होत नाहीत. त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत पालक व भगत, परिहार यांच्यावर कारवाई होऊ शकते. परंतु त्यापूर्वी समुपदेशन करून गरज पडल्यास कायदेशीर कारवाईचा वापर करावा लागेल.

चिखलदरा तालुक्यात घडलेली ही घटना अत्यंत वाईट असून, मेळघाटात सक्षम आरोग्य यंत्रणेसह प्रबोधनाची गरज दर्शविणारी आहे. त्यामुळे येथे काम करताना आरोग्य, ग्रामविकास, वन, पोलीस, महसूल अशा विविध विभागांच्या समन्वयाने सातत्यपूर्ण प्रबोधन मोहीम चालविणे आवश्यक आहे. स्थानिक बोलीत जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबविले पाहिजेत. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन अशा प्रकारांना तत्काळ आळा घालण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

– अ‍ॅड. यशोमती ठाकूर,  महिला व बालविकासमंत्री.