जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटीलांच्या आमदारकीच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारले असता मलिक यांनी हा आरोप केला.

मलिक म्हणाले, सन १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांना मिळालं आणि आता भाजपाची सत्ता आल्यावर ते त्यांच्याकडे वळले आहेत.

विखे पाटीलांचा मुलगा ज्यावेळी भाजपामध्ये गेला त्याचवेळीच राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते. पब्लिसिटीसाठी टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करीत आहेत, असा आरोप करताना विरोधी पक्षनेतेपद गेले हे सांगण्यासाठी आज त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे, अशा शब्दांत मलिक यांनी विखेंवर सडकून टीका केली.

विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते व काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या अगोदरच त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता.