प्रशांत देशमुख

मुख्याध्यापकांच्या नावाने शाळा ओळखण्याची परंपरा गेली कुठे, असा अंतर्मुख करणारा सवाल माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी रविवारी उपस्थित केला.

मुख्याध्यापक संघाचे ५९वे राज्य संमेलन सावंगी येथील मेघे सभागृहात झाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध चर्चासत्रे  झाली. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष दीपक दोंदल व संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुपारच्या विशेष चर्चासत्रात पुरके म्हणाले की, मुख्याध्यापक हा शाळेचा सूत्रधार असतो. त्याच्या कार्यक्षमतेवर शाळेचा विकास अवलंबून असतो. म्हणूनच कधीकाळी शाळेची ओळख मुख्याध्यापकाच्या नावे होत असे. अशी ओळख म्हणजे मुख्याध्यापकांच्या कर्तृत्वाची पावतीच ठरे. शिक्षकांनी अध्ययन व अध्यापन याशिवाय दुसरे काही करू नये, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. शिक्षक हा पूर्णवेळ शिक्षकच असतो, असे मानणारा समाज या वर्गाकडून चांगल्याची अपेक्षा ठेवतो. महात्मा गांधी म्हणत विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक गुणांना उजाळा देईल, तेच खरे शिक्षण होय. रंजकपर व प्रबोधनपर याची सांगड घालून शिकवण्याचा धर्म शिक्षकांनी पाळावा. गुणवत्तेची बुज राखण्याचे काम मुख्याध्यापकांनी करावे. जे जे चांगले, उत्तम ते विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करावा. उपेक्षितांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे कार्य करावे.

सकाळच्या सत्रात मेघे अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी गुरूजनांचे संस्कार हा समाजाचा आधार असल्याचे नमूद करीत बदलत्या काळात शिक्षकांची जबाबदारी बदलल्याचे सांगितले. ‘मास्तर’ या शब्दातच मोठा भावार्थ आहे. मा अधिक स्तर म्हणजेच आईच्या स्तरावर असणारा तो मास्तर होय, समाजाने इतक्या उंचीवर ठेवलेल्या शिक्षकाने हे भान ठेवून आपले वर्तन ठेवावे. सनदी लेखापाल राजेंद्र भूतडा यांनी शिक्षक, मुख्याध्यापकांची आर्थिक समज या विषयावर भाष्य केले.

याप्रसंगी माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांनी संचमान्यतेवर प्रकाश टाकला. अनिल बाळसराफ  स्मृती उत्कृष्ट संघटक पुरस्कार मुख्याध्यापक बळीराम झामरे (अकोला), विनोद नरोडे (वाशिम), रझीया बेग (गोंदिया), अशोक पारधी (भंडारा) यांना प्रदान करण्यात आला. तसेच रावसाहेब आवारी संघटक पुरस्कार मारुती खेडेकर (नागपूर), युनूस पटेल (औरंगाबाद), नरेंद्र वाळके (वर्धा) यांना देण्यात आले. संघटनेचे सचिव सतीश जगताप यांनी माहिती दिली.

काळेंच्या कानपिचक्या

उद्घाटनपर सत्रात मराठवाडय़ातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मुख्याध्यापकांची चांगलीच फिरकी घेतली. ते म्हणाले की, मुख्याध्यापकाने आपल्या पदाचे महत्त्व ठेवावे. या पदाला शासनाने द्वितीय श्रेणी अधिकाऱ्याचा दर्जा दिला आहे. मात्र साधा विस्तारअधिकारी शाळेत आला तर मुख्याध्यापक स्वत: उठून आपली खुर्ची त्याला बसायला देतो. इतके घाबरण्याचे काहीच कारण नाही. तसे केले नाही तर निलंबित व्हाल असेही नाही. तुम्हीच तुमच्या पदाचा दर्जा सांभाळला पाहिजे. मी मुख्याध्यापक असलेला आमदार असल्याने किती वेतन मिळते ते मला माहीत आहे. या पगारात आपण स्वत:ची चारचाकी घेऊन शाळेत जाऊ शकतो. मात्र पन्नास-पन्नास रुपये गोळा करून शाळेत एकाच्या गाडीने जाणारे पाहले की आश्चर्य वाटते. आज सुटाबुटात मुख्याध्यापक पाहायला मिळाल्याने बरे वाटले. कोट चढवायची संधी न सोडल्याबद्दल आनंदच आहे. अध्ययनातही अशी आधुनिकता दिसावी. शालेय पोषण आहार योजनेने मुख्याध्यापकांना आचारी करून सोडले. त्यातून मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहे. विविध घटकांना उत्तरदायी असणारा मुख्याध्यापक हा शाळेचा कणा असल्याने त्याने ताठ राहून शाळेचा नावलौकिक वाढवावा.