पुढच्या वर्षीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, अशा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मराठवाड्यातील भाजपाचे नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते. यामध्ये रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील, जयसिद्धेश्वर स्वामी, संजय जाधव, ओम राजेनिंबाळकर, प्रताप चिखलीकर यांचा समावेश होता.

मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे, या विधानामुळे पंकजा मुंडे यांची यापूर्वी बरीच चर्चा झाली होती. मुख्यमंत्री होण्याचा आपला मानसचं त्यांनी बोलून दाखवल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. मात्र, आज गोपीनाथ गडावर मुख्यमंत्री फडणवीसांनाकडे पाहून त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री महोदयांना मी आज सांगू इच्छिते की, आपण पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री म्हणून या मंचावर उपस्थित असाल त्यासाठी महाराष्ट्र भर मला जिथं जिथं जावं लागेल तिथं मी जाणार.

यावेळी जातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकवला, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, काही नेते स्वतःला राजा, महाराजा, जाणता राजा म्हणवून घेतात. याच लोकांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांबाबत जातीवाचक विधानं केले होते, अशा जातीयवादी लोकांना मुख्यमंत्री पुरुन उरले आहेत.