27 February 2021

News Flash

भाजीत मीठ जास्त पडले म्हणून पत्नीचे केस कापले

याप्रकरणी पीडित रूकसाना (वय २५) यांनी पती आसीफ शेख याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भाजीत मीठ जास्त घातले म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कात्रीने कापून टाकल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घडली. याप्रकरणी पतीविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

याप्रकरणी पीडित रूकसाना (वय २५) यांनी पती आसीफ शेख याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की त्यांनी आज बनवलेल्या भाजीत मीठ जास्त असल्याचे त्यांच्या पतीस जाणवले. यावरून तो संतापला आणि त्याने रुकसानाला लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली. त्याचा राग एवढय़ावरच शांत झाला नाही, तर घरातील कात्री घेऊन त्याने तिचे लांबसडक केस कापून  टाकले. पतीने केस कापल्याने रूकसाना ही लज्जित होऊन घराबाहेर पडली नाही. मात्र अपमानित झाल्याने दुसऱ्या दिवशी ती माहेरी आली. या वेळी बहिणीच्या मदतीने तिने आपल्यावरील अन्यायाबाबत काँंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका फिरदोस पटेल यांच्याकडे धाव घेतली. रूकसाना यांची अवस्था पाहून नगरसेविका पटेल यांनी तिला सोबत घेऊन सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी पीडित रूकसाना यांच्यावर घडलेला अत्याचार ऐकून तिच्या पतीविरूध्द तक्रार नोंदवून घेतली. तिचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला. तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. पती आसीफ शेख हा काहीच कामधंदा करीत नाही. रूकसाना हीच शेतमजुरी करून घराचा संसार चालविते. ती कामाला गेली नाही तर तो तिला त्रास देत असल्याचे तक्रारीत समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 2:46 am

Web Title: wife hair cut by husband in solapur for more salt in vegetable
Next Stories
1 कणकवलीतील विजयाने राणेंची नवी समीकरणे उलगडणार
2 अंगणवाडीतील बालकांच्या तपासणीत आरोग्य विभागाची चालढकल
3 आई रागावल्याने ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या..
Just Now!
X