लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, भागवत यांनी एके-४७ ही बंदूक बाळगली होती. त्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. हा खेळ तुम्ही सुरु केला होता भागवत, त्याचा अंत आम्ही करु, असेही त्यांनी म्हटले आहे.

नागपूरमधील वंचित बहुजन आघाडीतर्फे कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. संघाला देशातील कायदा मानायचा नाही, स्वत:च्या संघटनेची नोंदणी करायची नाही आणि जे विरोधात उभे राहतील त्यांच्याविरुद्ध अफवा पसरवायच्या, हे काम सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या खुनाच्या कटाच्या पत्राचा जो गवगवा केला गेला ते पत्र बनावट आहे. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मला गोवण्याचा प्रयत्न केला. पण मोहन भागवत तीन महिने वाट बघा, लोकसभेत तुमची संख्या दुहेरी आकड्यात मर्यादित करु आणि तुम्हाला तुरुंगात टाकू, असे आंबेडकर यांनी सांगितले. त्यांना कायद्यासमोर झुकवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणालेत. एके-४७ बाळगण्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे विसरु नका, असेही त्यांना भागवतांना उद्देशून सांगितले. मोहन भागवत एके -४ ७ घेऊन फिरत आहे, पण त्यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही, अशी टीका त्यांनी पोलीस खात्यावर केली.

रिझव्‍‌र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी इतिहास या विषयात पदवी घेतली आहे. सरकारने अर्थशास्त्रातील पदवी असलेल्या व्यक्तीला गव्हर्नरपदी नियुक्ती न करता इतिहासाची पदवी असलेल्या व्यक्तीला गव्‍‌र्हनर म्हणून नियुक्त केले आहे. इतिहासातील पदवीधराची नियुक्ती करून आरबीआयला इतिहास जमा करायचे आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला.