सोलापूर : शाश्वत शहरी विकास योजनेअंतर्गत सोलापूर महापालिका आणि स्पेनमधील मुर्सिया या शहरांदरम्यान गेल्या मे महिन्यात सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार स्पेनच्या आमंत्रणानुसार सोलापूरचे शिष्टमंडळ शाश्वत शहरी विकास योजनेअंतर्गत मूलभूत सुविधा सुकर करण्याबाबत वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी मुर्सियाला नुकतेच जाऊन आले. मुर्सिया भेटीचे दृश्य परिणाम येत्या तीन महिन्यांत सोलापूरकरांच्या दृष्टिक्षेपास येतील, असा विश्वास पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला आहे. अलीकडे ३० वर्षांच्या काळात सोलापूर महापालिकेच्या तत्कालीन अनेक महापौरांच्या नेतृत्वाखाली अनेक शिष्टमंडळे परदेश दौऱ्यावर गेली होती. त्याचा सोलापूर शहराच्या विकासासाठी कोणता लाभ झाला, हा संशोधनाचा विषय असताना आताच्या मुर्सिया दौऱ्याचे फलित मिळण्याबद्दल कशी अपेक्षा करायची, याची सोलापूरकर प्रश्नार्थक चर्चा करीत आहेत. परंतु, आतापर्यंतच्या अनेक परदेश दौऱ्यांच्या पश्चात सोलापूरकरांच्या हातात काहीही पडले नसताना आता मुर्सिया दौऱ्याचे फलित तीन महिन्यांत दिसू लागेल, असा भरोसा देणारे डॉ. ढाकणे हे पहिलेच पालिका आयुक्त ठरले आहेत.

मुर्सिया भेटीत सोलापूरच्या शिष्टमंडळाने एका कार्यशाळेत तेथील उच्च दर्जाच्या मूलभूत सोयी-सुविधांसह आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण, सांडपाणी व्यवस्था, पर्यावरणपूरक बाबी, अपारंपरिक ऊर्जा, रस्ते बांधणी, तेथील स्मार्ट इमारतींसह महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यानुषंगिक माहिती घेण्यात आली. आठ दिवसांच्या या दौऱ्यात मुर्सियातील शाश्वत विकासाच्या बाबींचे निरीक्षण करताना सोलापुरातील पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासंदर्भात तसेच मिळकत करामध्ये देण्यात आलेल्या सवलतींची माहिती या शिष्टमंडळाने मुर्सियाच्या महापौरांना देत, असा उपक्रम त्यांनीदेखील हाती घ्यावा, अशी सूचना केली. तसेच सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसह पंढरपूरच्या आषाढी यात्रेत लाखो भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण कसे केले जाते, त्याची पाहणी करण्यासाठी सोलापूरला येण्याचे आमंत्रण या शिष्टमंडळाने मुर्सियाच्या महापौरांना दिले आहे. एकंदरीत, मुर्सिया भेटीचा सोलापूरच्या विकासासाठी उपयोग होणार असल्याचा दावा पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केला आहे. मुर्सिया शहरात सोलापूरपेक्षा कमी म्हणजे केवळ ३५० मिलीमीटर पाऊस असूनही तेथील नदी बारा महिने वाहते. तेथे उत्तम प्रकारची जलवितरण व्यवस्था आहे. त्यानुसार त्यांच्याकडून योग्य सहकार्य घेऊन सोलापुरात आगामी काळात जलवितरण व्यवस्थेची कामे विकसित करता येतील. त्याचे प्रत्यक्ष दृश्य परिणाम येत्या तीन महिन्यात दिसू लागतील, असा विश्वासही डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला आहे. तर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनीही सोलापुरात वस्त्रोद्योग पार्क उभारण्यासाठी मुर्सियाची मदत घेतली जाणार असून त्यासाठी येत्या जानेवारी महिन्यात सोलापूर टेक्स्टाइल्स असोसिएशन व मुर्सियातील असोसिएशनची बैठक होईल. त्यानुसार त्यांच्यात सामंजस्य करार होईल. सोलापूर शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत ४४ कामांना मंजुरी मिळाली असून ही कामे दीर्घकालीन व दर्जेदार राहण्यासाठी मुर्सिया भेटीचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

यापूर्वी ३० वर्षांत सोलापूर महापालिकेची अनेक शिष्टमंडळे अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली परदेशाला जाऊन आली. चीन, रशिया, अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया अ’शा किती तरी देशांना सोलापूरच्या तत्कालीन महापौरांनी भेटी दिल्या आहेत. अशी परदेशवारी करताना कोणी घनकचरा व्यवस्थापनाचा तर कोणी पाणीपुरवठा व्यवस्थेचा अभ्यास करण्याचे कारण दिले, तर कोणी रस्ते विकासाच्या अभ्यासाचा मुलामा दिला.

एका महापौराने घनकचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी परदेश दौरा केला होता. परंतु यापैकी एकाही परदेश दौऱ्याचे फलित सोलापूरकरांना अनुभवास आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर उलट, परदेश दौऱ्यात सोलापूरच्या महापौराने स्वत:च्या वागण्याने कशी नाचक्की करून घेतली, याच्याही सुरस कथा आजही ऐकायला मिळतात. अभ्यास दौऱ्याचे निमित्त करून परदेश दौरे करण्यामागे मौजमजा ही गोष्ट लपून राहिली नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. एखाद्या गोष्टीचा अभ्यासच करायचा तर त्यासाठी परदेश दौरा हवाच कशाला? त्यापेक्षा आपल्या देशातच सुरत व अन्य शहरांचाही अभ्यास करता येतो. एवढेच नव्हे तर स्मशानभूमी कशी असावी, याचा अभ्यास करायला शेजारच्या सातारा येथे माहुली संगम घाटावर जाऊन तेथील पाहणी करता येते व त्यानुसार सोलापुरातील स्मशानभूमींचा कायापालट करता येतो.

चीनबरोबरील संधी गमावली

सोलापूरचे थोर मानवतावादी सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची समाधी असलेल्या चीनमधील सिचा च्वाँग या शहराबरोबर सोलापूरचा २७ वर्षांपूर्वी सामंजस्य करार झाला होता. केंद्र सरकारने सोलापूरचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त केल्यानंतर तशाच स्वरूपाची संधी सिचा च्वाँग-सोलापूर सामंजस्य कराराने आली होती. सिचा च्वाँग व सोलापूर भगिनी शहर म्हणून करार झाला होता. त्यातून सोलापूरचा विकास होण्याची नामी संधी आली होती. परंतु सोलापूर महापालिकेच्या उदासीनतेमुळे ही संधी वाया गेल्यात जमा आहे. हा करार अमलात आला असता तर दोन्ही शहरांमध्ये कला व संस्कृतीबरोबरच उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, उच्च विज्ञान व तंत्रज्ञान आदी बाबींची देवाण-घेवाण झाली असती. परंतु दोन्ही शहरातील शिष्टमंडळे एकमेकांकडे दौरे केल्याशिवाय पुढे काहीच हातीच लागले नाही. या कराराला मान्यता देण्यासाठी चीन सरकारची कोणतीही आडकाठी नव्हती. केवळ भारत सरकारकडून मान्यता मिळणे अपेक्षित होते. केंद्रात यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखा वजनदार नेता होता. त्यांच्याकडे योग्यप्रकारे पाठपुरावा झाला असता तर हा प्रश्न मार्गी लागला असता आणि पर्यायाने सिचा च्वाँग व सोलापूर भगिनी शहरांचा करार अमलात येऊन सोलापूरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असता. त्याबद्दलची अनास्था असल्याने सोलापूरकरांची चीन भेट लाभदायक ठरली नाही. इतर देशांच्या दौऱ्यांचे फलित काय, याचा हिशेब मांडण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.