केडगाव पोटनिवडणुकीदरम्यान घडलेला दोन शिवसैनिकांच्या हत्येचा प्रकार हा गंभीर असून कायदा हातात घेणाऱ्यांवर निश्चित कारवाई करू, असे आश्वासन नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहे. हत्येच्या हा प्रकार घडल्यानंतर २४ तासानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रया दिली आहे.

शिंदे म्हणाले, या गंभीर घटनेकडे मी स्वतः, मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक असे सर्वजण बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. काल घटना घडल्यापासून मी सर्व माहिती घेत आहे. त्यामुळे जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी शांतता राखावी, कायदा हातात घेणाऱ्यांवर निश्चित कारवाई करणार आहोत.

अहमदनगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण असताना पालकमंत्री राम शिंदे यांनी शिर्डीत मालपाणींच्या थीम पार्कच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे नगरच्या या दोन्ही मंत्र्यांवर टीका होत होती. त्यानंतर राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. अहमदनगरमधील पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन शिवसेनेला शह दिला. दोन्ही शिवसैनिकांच्या हत्येमागे या तिन्ही पक्षांचा हात असून अशी घटना तर उत्तर प्रदेशमध्येही घडत नाही. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थाच नाही, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली होती. एकीकडे युती हवी सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर घाव घालायचा हे भाजपाचे जुने धंदे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती. पोलिसांच्या संगनमतानेच ही घटना घडली असल्याचा आरोप करीत पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अहमदनगरमधील केडगाव येथे शनिवारी संध्याकाळी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. संजय कोतकर (वय ५५) आणि वसंत ठुबे (वय ४०) अशी या मृतांची नावे आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. केडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी रामदाम कदम यांनी नगर जिल्ह्याला भेट दिली.