08 March 2021

News Flash

नांदेड अन् अशोक चव्हाण हे समीकरण कायम राहणार?

महाराष्ट्राच्या राजकारणाला ‘आदर्श’ आणि ‘पेड न्यूज’ असे नवे मुद्दे देणारे नांदेड आणि तेथील नेते नेहमीच चर्चेत असतात

(संग्रहित छायाचित्र)

संजीव कुळकर्णी

देशात आणि राज्यात भाजपचे वारे वाहत असताना लोकसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंत काँग्रेसचा झेंडा नांदेडमध्ये फडकवीत ठेवणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. राज्याचे नेतृत्व करण्यासाठी लोकसभा स्वत: न लढता पत्नीला रिंगणात उतरविण्याची अशोकरावांची योजना असून, हाच धागा पकडत अशोकरावांची कोंडी करण्याची भाजपची योजना आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला ‘आदर्श’ आणि ‘पेड न्यूज’ असे नवे मुद्दे देणारे नांदेड आणि तेथील नेते नेहमीच चर्चेत असतात. २०१४च्या निवडणुकीत राज्यातून काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते. त्यात नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि शेजारील हिंगोलीत राजीव सातव यांचा समावेश होता. या वेळी या दोन्ही जागा राखून ठेवण्याची पहिली जबाबदारी चव्हाण यांच्यावर आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची अशोकरावांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यातूनत लोकसभेऐवजी विधानसभा लढविण्याचे त्यांच्या मनात आहे. आपल्याऐवजी पत्नी अमिता यांनी लोकसभेला उभे करण्याचा प्रस्ताव त्यांनी अ. भा. काँग्रेसला सादर केला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मान्यता दिली तरच अशोकरावांची लोकसभेच्या रिंगणातून सुटका होऊ शकेल.

मागील २५ वर्षांत काँग्रेसने जेव्हा जेव्हा विद्यमान खासदारांऐवजी नांदेडमध्ये नवा उमेदवार दिला तेव्हा त्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. हा पूर्वेतिहास लक्षात घेता पत्नीला निवडून आणण्यात अशोकरावांना शक्य होऊ शकते. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण हे समीकरण तयार झाले. यातूनच आजूबाजूच्या जिल्ह्य़ांमध्ये भाजपने मुसंडी मारली असली तरी नांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी ७३ जागा जिंकून अशोकरावांनी साऱ्यांनाच चकित केले होते. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही सारे विरोधक एकत्र आले तरीही काँग्रेसने विजय मिळविला होता. जिल्हा परिषदही ताब्यात कायम ठेवण्यात यश आले. नांदेड जिल्ह्य़ात भाजपची घोडदौड रोखली तसेच एमआमएमच्या वाढत्या वर्चस्वाला आवर घातला. अशोक चव्हाण विरुद्ध सारे विरोधक असे चित्र जिल्ह्य़ात असले तरी अशोकरावांनी साऱ्यांवर लीलया मात केली आहे.

अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा निर्धार भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला असला तरी नांदेडमध्ये पक्षाचा उमेदवार कोण असावा हेच अद्याप निश्चित झालेले नाही. जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे, माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांच्यासोबतच डॉ. साहेबराव मोरे हे एक नाव चच्रेत आहे. अलीकडच्या काळात पक्षाच्या अनेक बठका झाल्या.

१९९६ पासून नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. तेव्हापासूनच्या सहापैकी पाच निवडणुकांत काँग्रेसची सरशी झाली. भाजप-शिवसेना हे पक्ष तेव्हाही एकत्र होते तरी त्यांच्या युतीचा काँग्रेसच्या यशावर परिणाम झाला नाही, अपवाद २००४ सालचा! ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नांदेडची जागा गमवावी लागली. भास्करराव पाटील खतगावकरांसारखा अनुभवी नेता पराभूत झाला होता.

नांदेड लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा क्षेत्रांत विभागला असून तीन आमदार काँग्रेसचे तर तीन आमदार युतीचे आहेत. २०१४ च्या निवडणुकीवेळी युतीचा एकही आमदार नव्हता. काँग्रेसचे सर्वत्र प्राबल्य असताना अशोक चव्हाण ८० हजारांच्या मताधिक्याने जिंकले होते. आता पाच वर्षांनंतर भाजपने संघटनात्मक स्थिती बळकट केली आहे, या काळात काँग्रेसमधील अनेक दिग्गज भाजपमध्ये गेले आहेत. त्यातील अनेकांचा आपल्या कार्यक्षेत्रात प्रभाव आहे.

खासदार अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीत आणण्याचे प्रयत्न चालविले असले तरी आंबेडकर यांनी सर्वात आधी नांदेडसाठी प्रा. यशपाल भिंगे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे.

नांदेड जिल्हा काही अपवाद वगळता नेहमीच काँग्रेस विचारांच्या बाजूने राहिलेला आहे. गेल्या निवडणुकीत त्याचाच प्रत्यय आला. दुसऱ्या बाजूला भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मोठमोठी स्वप्ने दाखवत आधी केंद्रात आणि नंतर राज्यात सत्ता प्राप्त केली; पण भाजपने देशाचे तर युतीने राज्याचे वाटोळे केले. १७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषणामुळे बालमृत्यू, महिलांवर अत्याचार, वाढलेली बेरोजगारी ही या सरकारांची देण होय. आपण दोघे भाऊ अन् महाराष्ट्र लुटून खाऊ अशा पद्धतीने भाजप-शिवसेनेने राज्याचा कारभार केला आहे. त्यामुळे जनता या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवून देईल.

–  अशोक चव्हाण, खासदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

२०१४ साली नांदेडच्या मतदारांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री या नात्याने अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांना लोकसभेवर पाठविले. पण मागील पाच वर्षांत त्यांना तेथे भरीव कामगिरी पार पाडता आली नाही. केंद्र सरकारकडून त्यांना कोणतीही मोठी योजना किंवा प्रकल्प आणता आला नाही. मागच्या निवडणुकीत ते जेमतेम ८० हजार मतांनी विजयी झाले. पाच वर्षांनंतर भाजपची संघटनात्मक स्थिती खूप बळकट झाली आहे. पक्षाचे सभासद ४० हजारांवरून दीड लाखांपर्यंत वाढले आहेत. हे नवे सभासद तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाखो लाभार्थी यंदा नांदेडमध्ये निश्चितपणे परिवर्तन घडवतील.

– राम पाटील रातोळीकर, आमदार जिल्हाध्यक्ष (भाजप नांदेड)

विधानसभेचे राजकीय चित्र

नांदेड दक्षिण    शिवसेना

नांदेड उत्तर     काँग्रेस

भोकर             काँग्रेस

नायगाव         काँग्रेस

देगलूर          शिवसेना

मुखेड            भाजप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:59 am

Web Title: will the equation of nanded and ashok chavan remain
Next Stories
1 धामणी धरण अंधारात
2 भोये गुरुजी नव्वदीतही कर्ममय
3 ‘ताटातुटी’नंतर आता एक व्हा रे!
Just Now!
X