युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवसेना भाजप युतीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून शिवसेनेकडून आता त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे. तसेच हीच वेळ आहे, हीच संधी आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय, असे म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोअर कमिटीकडून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणुकांपूर्वीही अशी मागणी झाली होती. तसेच मतदारसंघही निश्चित करण्यात आला होता. परंतु खुद्द आदित्य ठाकरेंनीच या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनादेखील यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय त्यांचाच असेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. आदित्य ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या सभांमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या निवडणुकीत राज्यात धनुष्यबाण आणि कमळाची हवा असल्याचे ते म्हणाले होते. तसेच त्यांनी तळागाळात जाऊन प्रचारही केला होता.

यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनची निवडणूक लढवली होती. त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या त्यांच्या खांद्यावर आहे. तसेच त्यांनी आदित्य संवाद हा कार्यक्रमदेखील सुरू होता. त्यालाही तरूण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातच अनेक राजकीय बैठकांनाही ते उपस्थित राहत आहेत. त्यामुळे आता युवासेनेच्या मागणीवर आदित्य ठाकरे काय उत्तर देतात हे पहावे लागेल.